करोना लसीवरून राडा! रांगेत उभ्या असलेल्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  देशात सध्या करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे दिसत आहे. त्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर देण्यात येत आहे.  करोनापासून बचावासाठी लस घेण्यासाठी अनेकजण  लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. मात्र, हीच गर्दी अनेकदा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरते. असेच एक प्रकरण आता मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातून समोर आले आहे. लसीकरणासाठी आलेल्या महिलाच आपसात भिडल्या आणि त्यांच्यात तुंबळ हाणामारी सुरू झाली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

खरगोनच्या कसरावद येथील खलबुजुर्ग गावातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.  या व्हिडिओत दोन महिला लसीकरण केंद्रातच हाणामारी करू लागल्या आहेत.  तसेच लसीकरण केंद्रावर महिलांची मोठी रांग लागलेली आहे. यादरम्यान आधी लस कोण घेणार यावरुन अनेक महिलांमध्ये वाद सुरू झाले.

आधी किरकोळ वाद आणि नंतर वादाचे थेट हाणामारीत रुपांतर झाल्याचे  दिसत आहे. प्रकरण इतकं पुढे गेलं की लस घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या महिला एकमेकींचे केस ओढू लागल्या. इतकंच नाही तर काही महिलांमध्ये तर धक्काबुक्कीही सुरू झाली.

महिलांनाच हे भांडण सोडवण्यासाठी  काही पुरुष  प्रयत्न करत आहेत, मात्र ते अपयशी ठरतात. तर, काही लोकांचे असे म्हणणे आहे, की सेंटरवर योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे भांडण झाले आहे. ज्याला जिथून जागा मिळाली तिथून तो सेंटरमध्ये घुसला, यामुळे तिथल्या कर्मचाऱ्यांच्या कामातही अडथळा आला. याआधीही मध्य प्रदेशच्या धारमध्ये लसीकरण केंद्रावर लोकांची गर्दी झाल्याने  एकच गोंधळ उडाला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.