लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः…

महापालिकाच टाकतेय नदीपात्रात राडारोडा

अधिकाऱ्यांना दिसत नाही का?

गेल्या काही दिवसांत नदीपात्रात नारायणपेठ तसेच शनिवारपेठेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात राडारोड आणि कचरा आणून टाकला जात आहे. विशेष म्हणजे, हा कचराही वारंवार जाळला जात आहे. मात्र, एका बाजूला नदीसंवर्धनाच्या नावाखाली पालिका प्रशासन स्वत:ची पाठ थोपटून घेत असताना सामान्य नागरिकांना दिसणारे हे प्रकार महापालिका अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. तसेच अशा प्रकारांवर कडक कारवाईची तरतूद असताना त्यांना पाठीशी घालण्यात येत आहे.

पुणे – नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांकडून महापालिका 25 हजार रुपयांचा दंड वसूल करते. मात्र, पालिकेकडूनच राजरोसपणे नदीपात्रात राडारोडा टाकला जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर हा प्रकार घडला असून 15 ते 20 ट्रक राडारोडा जयंतराव टिळक पुलाबाजूच्या नदीपात्रात टाकण्यात आला आहे.

शनिवारवाड्याकडून नदीपात्रात येणाऱ्या रस्त्यावर अमृतेश्‍वर मंदिरासमोरील बाजूस नवीन ड्रेनेज वाहिनी मागील आठवड्यात टाकण्यात आली. या कामासाठी संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस हा रस्ता बंदही ठेवण्यात आला होता. ही खोदाई केल्यानंतर प्रत्यक्षात या राडारोड्याची विल्हेवाट संबंधित ठेकेदाराने लावणे आवश्‍यक होते. मात्र, प्रत्यक्षात हे काम महापालिकेचेच असल्याने हा सर्व राडारोडा पुलाच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात टाकण्यात करण्यात आलेला आहे.

सुमारे 10 ते 15 ट्रक हा राडारोडा असून त्याचे ढीग पुलावर उभे राहिल्यास सहज दिसून येत आहेत. त्यामुळे एका बाजूला नदीसुधारणेचा नारा देत जपान येथील “जायका’ कंपनीच्या माध्यमातून कर्जाने रक्कम घेऊन पालिकेकडून 950 कोटींची नदीसुधार योजना राबविण्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे थेट नदीतच राडारोड्याचे ढीग रचले जात असल्याने पालिकेच्या या अनागोंदी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Maj Gen S C N Jatar, Retd says

    आपले पदाधिकारी व अधिकारी याना दिसत नाही. जे दिसते ते त्यांच्या फ़ायद्याचेच

Leave A Reply

Your email address will not be published.