कराड -नगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांवर इम्तियाज बागवान यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन पालिका कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांना दिले आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह शेकडो पालिका कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, इम्तियाज बागवान यांचा वारंवार पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांना होत असलेल्या त्रासाच्या निषेधार्थ मंगळवार, दि. 20 रोजी सकाळी 11 वाजता पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध करत कामबंद आंदोलन केले.
याबाबतची माहिती अशी की, कराड पालिका महिला कर्मचारी पालिकेच्या आवारात साफसफाई करत होत्या. त्यावेळी इम्तियाज बागवान हे त्यांच्या दुचाकीवरून आले. जेथे महिला कर्मचारी साफसफाई करत होत्या. त्याचठिकाणी त्यांनी आपली दुचाकी पार्क केली. यावर महिला कर्मचाऱ्यांनी येथे साफसफाई सुरू आहे.
त्यामुळे येथे गाडी लावू नका, अशी विनंती केली. मात्र, इम्तियाज बागवान यांनी त्यांचे न ऐकता उलट त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत दमदाटी केली. यामुळे संबंधित महिलांनी पालिकेचे मुख्याधिकारी व पदाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. तसेच कराड शहर पोलीस ठाण्यातही इम्तियाज बागवान यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन दिले.
या घटनेनंतर पालिकेत एकच गोंधळ उडाला. त्याचा निषेध करण्यासाठी सर्व कर्मचारी संघटीत झाले. इत्मियाज बागवान यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्यांनी काम बंद आंदोलन करत पालिकेला टाळे ठोकले.
इम्तियाज बागवान हे माहितीच्या अधिकाराखाली पालिकेतील सर्व कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सातत्याने दमदाटी करत असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे.
या निवेदनावर महिला कर्मचारी सुनीता आठवले, ललिता मोरे, ताराबाई भोसले रा. बुधवार पेठ, कराड यांच्या सह्या आहेत. निवेदन देतेप्रसंगी कराड नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे प्रदीप भोकरे, सुंदर गोसावी, युवराज भोसले, आनंदा खवळे, बबनराव जाधव, माणिक बनकर, कृष्णा काटरे यांच्यासह कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पालिका कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात केलेली तक्रार ही धादांत खोटी व पूर्वनियोजित कटाचाच प्रकार आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. मी कोणावरही जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही. याबाबतचे पालिकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावेत.
दि. 25 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे झालेला सत्कार कार्यक्रम हा आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणारा आहे. याच महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हा कार्यक्रम घेणे हे कायद्याला धरून नाही. याबाबत मी तक्रार केली आहे. या तक्रारीची चौकशी सुरू झाल्याने जाणिवपूर्वक मला टारगेट केले जात आहे.
इम्तियाज बागवान, कराड