बीड : महायुतीने सरकार स्थापन केल्याने आता आमदारांना वेध लागले आहे ते मंत्रीपदाचे. येत्या काही दिवसांत मंत्री मंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यामध्ये फडणवीस सरकारमधील मंत्रिपदाच्या संधीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या जिल्ह्यातून मंत्री पदासाठी ५ जणांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे जाणून घेऊया…
मंत्रीपदासाठी ‘या’ 5 जणांची नावे चर्चेत
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला २ जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी राज्याचे माजी कृषिमंत्री आमदार धनंजय मुंडे, भाजप नेत्या, आमदार पंकजा मुंडे, पाच वेळा आमदार झालेले भाजपचे सुरेश धस, पाच टर्म आमदार असलेले राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आणि राखीव असलेल्या केज विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या टर्मला निवडून आलेल्या नमिता मुंदडा यांची नावे सध्या मंत्रीपदासाठी चर्चेत आहे. त्यामुळे यंदा कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
पंकजा मुंडे यांनी केला मंत्रीपदावर दावा
भाजपला पंकजा मुंडे यांना मंत्रिपद द्यावेच लागणार आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. गेली ५ वर्षे पंकजा यांचे राजकारण, भाजपबद्दल अप्रत्यक्ष व्यक्त केलेली नाराजी, स्वपक्षांविरोधात उपसलेली बंडाची तलवार, अशा सगळ्या परिस्थितीतून सावरून त्या पक्षात टिकल्या. लोकसभेला पराभूत होऊनही विधानसभेला पक्षासाठी महाराष्ट्रभर दौरे केले. ओबीसी बहुल मतदारसंघात जाऊन त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.
भाजपच्या विजयात पंकजा यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना मंत्रीपद द्यावे लागणार आहे. पण दुसरीकडे त्यांचे बंधू धनंजय मुंडे हेदेखील मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे आता महायुती सरकार या दोघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ घालणार? कि दुसऱ्या कोणाला मंत्रीपद देणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.