नोंद: टागोरांच्या विचारांचे औचित्य!

देवयानी देशपांडे

2021 हे रवींद्रनाथ टागोरांचे
160 वे जयंतीवर्ष! टागोरांचे विचार, कार्य आणि संदेश कालातीत आहेत. त्यांच्या संदेशातील “दैशिक प्रेरणा आणि वैश्‍विक दृष्टीकोन’ हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण सूत्र आज आपण ध्यानात घेतले पाहिजे असे आहे. हे सूत्र समयोचित आहे.

कोविड19 महामारीच्या पार्श्‍वभूमीवर आणि त्यानिमित्ताने आपण ज्या संक्रमणावस्थेचा अनुभव घेत आहोत त्यामध्ये टागोरांचे काही विचार नक्‍कीच दिशादर्शक ठरतील. कविता आणि तात्त्विक मांडणीपलीकडे जाऊन टागोरांनी केलेला संदेश महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थापन प्रक्रिया आणि शिक्षणव्यवस्था यांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी टागोरांकडून काही उपयुक्‍त पाठ घेता येतील. आज आपल्यापुढे “आ’ वासून उभ्या असलेल्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे टागोरांच्या कालातीत विवेचनामध्ये गवसतात का पाहूयात.

एतद्देशीय प्रेरणा आणि वैश्‍विक आवाहन: कोविड महामारी ही केवळ आरोग्यक्षेत्राने आणि प्रशासनाने दखल घ्यावयाची बाब नाही. जागतिक पातळीवर अनेक उलथापालथी घडवणारी ही महामारी आपल्याला काही मूलभूत प्रश्‍नांचा परामर्श घेण्यास भाग पाडते. टागोरांच्या विवेचनातून हे प्रश्‍न अधोरेखित होतात, एतद्देशीय प्रेरणेविना वैश्‍विक दृष्टीकोन असणे शक्‍य आहे का? वर्तमान कालखंडात आधुनिक व्यवस्थापनाप्रती भारतीय संस्कृती आणि ज्ञानाच्या योगदानाची आपल्याला जाणीव आहे का? टागोरांच्या संदेशानुसार, वैश्‍विक विचारधाटणी विकसित करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या संस्कृतीची मूलतत्त्वे लक्षात घेणे,इतर सभ्यतांची पाळेमुळे लक्षात घेणे आणि सामाईक भविष्यलक्षी कृतीसाठी सभ्यतांमधील साम्यस्थळे आणि भेदांचा नेमका वेध घेणे आवश्‍यक आहे. आजच्या संदर्भात यावर विचार होणे महत्त्वाचे ठरते.

समग्र व्यवस्थापन तत्त्वज्ञान आणि शिक्षण : कोविड महामारी आणि त्याचा परिणाम म्हणून निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत आपल्याला एक प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. नियतीला शरण जात असताना, निसर्गाचे आगळेवेगळे रूप अनुभवत असताना उत्कर्ष नेमका कशासाठी आणि कोणासाठी?’ असा महत्त्वपूर्ण प्रश्‍न आपल्याला नक्‍की पडतो. टागोरांनी सुमारे एक शतकापूर्वी हा प्रश्‍न उपस्थित केला. शिक्षणपद्धती निसर्गाशी एकवाक्‍यता बाळगणारी असावी हे टागोरांच्या विचारातून अधोरेखित होते.

त्यामुळे निसर्गाचे संकेत टिपून त्यानंतर ज्ञाननिर्मितीमध्ये सक्रिय असणाऱ्या आपल्या बोधात्मक क्षमता अधिक धारदार होतील, असे ते म्हणतात. चीन येथील एका वक्‍तव्यात टागोरांनी पुढील विधान नमूद केले होते, “निसर्गाची उपजत अशी काही खास शिक्षण मूल्ये असल्याने मुलांनी निसर्गाच्या सान्निध्यात राहावे, अशी माझी धारणा आहे. विद्यार्थ्यांना मानवरूपी आणि निसर्गरूपी असे दोन प्रकारचे शिक्षक असतात’.

आज व्यवस्थापन अभ्यासक्रमात पर्वतारोहणासारखे साहसी उपक्रम दिले जातात तेव्हा टागोरांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. शिवाय, सध्या शैक्षणिक वर्षाचे गणितच बिघडले आहे. परंतु, तरीही मुलांचे शिक्षण थांबले नाही. आपापल्या परीने, कलाकलाने शिक्षण अव्याहत सुरू राहते तेव्हा टागोर आठवल्यावाचून राहत नाहीत. जगण्याशी आपली जैविक बांधिलकी आहे आणि म्हणून त्यांचा संदेश समर्पक आहे.
भावभावना आणि सौंदर्याभिरुचीची जोपासना : सर्वांगीण मानव विकास कसा साधायचा? हा प्रश्‍नदेखील आज आपल्यापुढे आहे. टागोर म्हणतात, आज कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षण संस्थांमध्ये अनेक समस्या व्यक्‍तीच्या भावभावनांशी संबंधित आहेत.

अध्ययनामध्ये आजही भावनिक गुणांकाला तितकेसे महत्त्व दिले जात नाही, असे टागोर म्हणतात. शैक्षणिक अभ्यासक्रम पुनरुज्जीवित करून त्यामध्ये बदल करण्यासाठी टागोरांचे प्रयोग आणि आत्मभान उपयुक्‍त ठरेल. प्रचलित विषयांपेक्षा साहित्य, सामुहिक विकास कार्यक्रमांची अंमलबजावणी, निसर्गाचे निरीक्षण आणि शोध, मौन धारण करून भावनिक बुद्धिमत्ता, दर्जेदार सौंदर्य अभिरुची आणि भावभावना आधारित विचार या माध्यमातून ज्ञानेंद्रियांच्या क्षमता विकसित करणे यावर आधारित अभ्यासक्रम निर्माण करणे ही आजची गरज आहे. आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये व्यक्‍तीच्या विचारक्षमतेला पैलू पाडले जात असले तरी यासाठी “भाव’ या क्षमतेची किंमत मोजली जाते.आज च्या परिस्थितीत चिंतनासाठी या सर्व मुद्द्यांचा विचार होणे प्राप्त आहे.

व्यवस्थापन शिक्षणपद्धती आणि मानव्यशास्त्रे : आधुनिक व्यवस्थापन शिक्षणपद्धतीची आणखी एक समस्या आहे. या शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून विद्यार्थी आणि कार्यकारी या दोघांतील आत्मविश्‍वास हा अहंकाराशी साधर्म्य बाळगणारा आहे. त्यांच्याकडे कोणत्याही समस्येचे एकच तांत्रिक आणि व्यावहारिक उत्तर आहे. इतर खाचाखोचा त्यांना मान्य नाहीत आणि ते शोधात देखील नाहीत. या एकरेषीय विचारांचा परिणाम म्हणून “निरस’ दृष्टीकोन जन्माला येतो. म्हणून समस्या आणि उपाय यांमध्ये गंभीर असंतुलन निर्माण होते. अशा प्रसंगी मानव्यशास्त्रांतील (कला, साहित्य, नृत्य, संगीत, नाटक, चित्रपट) आदाने महत्त्वपूर्ण ठरतील. टागोरांचे अध्ययन तत्त्वज्ञान आपली “पठडीबाहेरचा’ विचार करण्याची क्षमता वर्धित करेल.

समस्या आणि उपाय यांमधले असंतुलन तर सध्या आपण रोजच अनुभवत आहोत. यासाठी शासन आणि प्रशासनावर ताशेरे ओढण्याखेरीज आपण फारसे काही करत नाही हे दुर्दैवच! पण या असंतुलनाचे मूळ शिक्षणपद्धतीत आहे असे म्हटले तर? पाहूयात तरी विचार करून.

उद्योजकांचे सामाजिक दायित्त्व आणि समावेशी भूमिका : “समाजाभिमुखता असणे’ ही सामाजिक दायित्त्वाची पहिली पायरी होय. यामुळे समाजाच्या नेमक्‍या गरजा लक्षात घेता येतील. अन्यथा, “उद्योजकांनी ओळखलेल्या समाजाच्या गरजा’ आणि “समाजाच्या प्रत्यक्ष गरजा’ यांमध्ये तफावत निर्माण होईल. टागोरांचा समुदाय विकासाचा उपक्रम शिक्षक, विद्यार्थी आणि उद्योजकांमध्ये नम्रभाव उत्पन्न करील. यातून काही उत्तम उपक्रम राबवता येतील. आज महामारीच्या काळात अभिशासनामध्ये उद्योजकांच्या सामाजिक जबाबदारीला महत्त्व दिले जात आहे. अशावेळी टागोरांचे विचार आठवल्यावाचून राहत नाहीत. सामाजिक बांधिलकी टिकवून ठेवण्यासाठी ज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे उद्योजक घडावे यासाठी काय आवश्‍यक आहे? तर निर्णयप्रक्रिया आणि अभिशासनामध्ये त्यांचा सहभाग असावा. त्याची हमी टागोरांनी सुचवलेल्या समुदाय विकास कार्यक्रमातून मिळते.

सध्या आपण सारेच “कोविडनंतर काय?’ या प्रश्‍नाचे उत्तर शोधतोय. याचे उत्तर शोधताना एका अर्थाने आपण शाश्‍वत भविष्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. टागोरांनी व्यवस्थापन शिक्षण शाखा ध्यानात घेऊन मांडलेली ही सूत्रे सर्वांगीण शिक्षणातील उत्तमता आणि शाश्‍वतता ध्यानात घेणारी आहेत. व्यवस्थेमध्ये असलेल्या गोंधळावर तोडगा शोधण्यासाठी, परिवर्तनासाठी टागोरांकडून कोणता पाठ घेता येईल यावर चिंतन होणे गरजेचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.