बारामतीच्या जिरायती भागात रब्बीची लगबग

– बाळासाहेब वाबळे

काऱ्हाटी – बारामती तालुक्‍यातील जिरायती भागासह पुरंदर तालुक्‍यात गेल्या 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या दमदार पावसामुळ बळीराजा सुखावला आहे. सध्या जिरायती भागात काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू असून अनेक ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीला वेग आला आहे. दरम्यान, सुपा परिसरात गेल्या वर्षी दुष्कामुळे केवळ 15 टक्‍केच ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र, यंदा वरुणराजाने बऱ्यापैकी कृपा केली अन्‌ कऱ्हानदीही खळखळत असल्याने यंदा आतापर्यंत 48 टक्‍के पेरणी झाली असून पेरणीचा टक्‍का वाढणार असून यंदा भरघोस उत्पादन निघण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

बारामती तालुक्‍यातील जिरायती भागात गोकुळाष्टमीपासून ज्वारीच्या पेरण्यांना सुरुवात केली जाते. मात्र, यंदा ऐन पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी पेरण्या कराव्यात का नाही, अशा द्विधावस्थेत होता. काही निवडक शेतकऱ्यांनी पाऊस पडेल, या आशेने ज्वारीच्या पेरण्या केल्या होत्या; मात्र पाणीटंचाईचे सावट अधिक गडद झाल्याने त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली.

बारामती तालुक्‍यात खरिपापेक्षा रब्बी हंगामाच श्‍वावत मानला जातो. मात्र, पश्‍चिम भागात ज्या ठिकाणी थोडेफार पाणी आहे, त्याठिकाणी खरीप हंगामातील बाजरीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यातच पावसाने ओढ दिल्याने उत्पादन कमालीचे घटले आहे. तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. मात्र, 10 ते 12 दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी आनंदला आहे. पुरंदर तालुक्‍यासह बारामती तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे पाच वर्षे कोरडी पडलेल्या कऱ्हानदी “ओव्हर फ्लो’ झाली, त्यामुळे सुपे परिसरातील काऱ्हाटी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, नारोळी, कोळोली, जळगाव कडेपठार, जळगाव सुपे, माळवाडी, लोणी भापकर, बाबुर्डी, शेरेवाडी, राजबाग आदी गावांमध्ये रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीसाठी व बाजरी छाटणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

एकीकडे निवडणुकीची चाललेली रणधुमाळी व दुसरीकडे अचानक आलेल्या पुराचे प्रमाण कमी होत असताना व पडलेल्या पावसाच्या ओलीवर रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, मका, पेरणीसाठी शेतकऱ्याची धावाधाव सुपे परिसरात सुरू आहे.

अझेटोबॅक्‍टरची प्रक्रिया करून बियाणे वापरा
जमिनीतील ओलावा संपुष्टात आला की ज्वारी, कांदा आदी पिके कोमजण्याची शक्‍यता असते. तरी पिके कोमेजून कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून पेरणी अगोदर अझेटोबॅक्‍टर याची प्रक्रिया करूनच बियाणे वापरावीत, असे आवाहन कृषी सहाय्यक अमोल लोणकर व कृषी पर्यवेक्षक विजय चांदगुडे यांनी केले आहे.

चांगल्या बियांसाठी घेताहेत तज्ज्ञांची मदत
शेतीला लागणाऱ्या बियाणाच्या व खतांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्यामुळे बळीराजाची दमछाक होताना दिसत आहे. चांगल्या पद्धतीची बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी कृषी सहाय्यक किंवा कृषीक्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेत आहे.

उष्णतेचा दाह वाढल्याने कुठल्याही क्षणी पाऊस येण्याची शक्‍यता वातावरणातील बदलांमुळे जाणवत आहे. यामुळे गोंधळलेल्या शेतकरी बाजरी पिकाची छाटणी करून मिळेल त्या साधनाने ज्वारीची पेरणी जलदगतीने करीत आहे.
– मालती रायकर, प्रगतशील शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.