कराड तालुक्‍यातील रब्बीच्या पेरण्या पूर्णत्वाकडे

कराड – मागील पावसाच्या कटू आठवणी विसरून शेतकरी दिवाळीनंतर रब्बी पिकाच्या तयारीला लागला होता. आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत तालुक्‍यातील 90 टक्‍क्‍यांवर रब्बी पिकांची पेरणी पार पडली आहे. यंदाच्या अतिवृष्टीमुळे रब्बी पिकांच्या पेरणीचा हंगाम महिना-दीड महिना उशिरा सुरू झाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून रब्बीला पोषक असे वातावरण तयार झाले असून पडणाऱ्या थंडीमुळे पिकांची वाढ योग्य प्रमाणात होत आहे.

रब्बी हंगाम हा ऑक्‍टोबर ते जानेवारी या महिन्यांमध्ये असतो. या हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, करडई, उन्हाळी भुईमूग यासारख्या पिकांचा समावेश असतो. मात्र खरीप हंगामाचा कालावधी वाढल्याने रब्बी हंगामाचा कालावधीही पुढे चालला आहे. खरीप आणि रब्बीचा हंगाम बदलत असल्याने उन्हाळी पिकांचाही कालावधी बदलत आहे.

मागील पावसाळ्याच्या सुरुवातीला पाऊस शेतीवर मेहेरबान राहिला. नंतर मात्र त्याने रौद्ररूपच धारण केले. प्रारंभी सततच्या पावसाने उसंत मिळू दिली नाही. नंतर परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता पावसाच्या कटू आठवणी विसरून शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला केली होती. शेताची मशागत करणे, पेरणीसाठी शेत तयार करण्याची लगबग सुरू होती. आता जिह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या पूर्णत्वास गेल्या आहेत.

अति पावसाने खरीप पिके हातची गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अगदी लावलेला खर्चदेखील वसूल झाला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिकअवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाकडे लक्ष लागले आहे.

गहू, हरभरा लागवडीमध्ये वाढ…
कराड तालुक्‍यात सततचा पाऊस झाल्याने परिसरात पाणी उपलब्ध झालेले आहे. सिंचनाची चांगली सोय असल्याने परिसरात हरभरा, गहू लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल आहे. शिवाय काही शेतकरी मका, उन्हाळी भुईमूग, भाजीपाल्याचे देखील उत्पन्न घेण्याची तयारी करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.