पारनेर – आमची सगळी मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतात. परंतु महाराष्ट्रात असे दोनच नेते आहेत ज्यांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली एक म्हणजे आर. आर. पाटील आणि दुसरे नीलेश लंके असल्याचे प्रतिपादन खा. सुप्रिया सुळे यांनी केले.
आ. लंके यांच्या पुढाकारातून काढण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रेच्या प्रारंभाप्रसंगी खा. सुळे बोलत होत्या. या वेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाबाजी तरटे, सुवर्णा धाडगे, राजेश्वरी कोठावळे, पूनम मुंगसे, विक्रमसिंह कळमकर, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, सुदाम पवार, ऍड. राहुल झावरे, दादा शिंदे, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, संतोष वारे, राणी लंके, बाळासाहेब कावरे, अशोक घुले, कारभारी पोटघन, जितेश सरडे, सचिन पठारे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दळवी, जगदीप साठे, चंद्रकांत मोढवे, सचिन पवार, योगेश मते, बाळासाहेब लंके, सचिन औटी, विजय औटी, भूषण शेलार, बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे आदी उपस्थित होते.
खा. सुळे म्हणाल्या की, आ. लंके यांचे भाषण मी ऐकत होते, त्या वेळी प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर एक अभिमान होता, आनंद होता. राष्ट्रवादीने काही निर्णय चुकीचेही घेतले असतील, परंतु नीलेश लंके यांना तिकीट देण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य ठरला. चटई उचलणारा हा पहिलाच आमदार असेल. देवदर्शनासाठी राणीताई आणि नीलेश लंके हे दोघेही जाणार आहेत. पहिल्या गाडीत राणीताई, तर शेवटच्या गाडीत नीलेश लंके असतील. पुन्हा येताना प्रत्येक माऊली तिच्या घरी जाईपर्यंत लंके घरी जाणार नाहीत, ही अभिमानाची गोष्ट आहे.
दिल्लीपासून गल्लीपर्यंत चाहते
एवढा साधेपणा, एवढे लोकांचे प्रेम खरंच आपल्याला अभिमान वाटावा, असे आ. लंके यांचे काम आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा तर आ. लंके यांच्यासारखा असावा. अतिशय सुंदर आदर्श त्यांनी महाराष्ट्राला घालून दिला आहे. आता महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत लंके यांचे चाहते आहेत.
स्टार प्रचारक म्हणून लंके हवेत!
लोकसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून आताच मी लंके यांचे बुकिंग करून ठेवते आहे. तुम्ही जिल्हा सांभाळा. लंके यांना राज्यात प्रचार करायला पाठवायचे आहे. बूथ तुम्हीच सांभाळायचं आहे. लोकसभेला व विधानसभेला एक लाखांचे लीड द्यायचे आहे. लंके लोकांसाठी इतकी वर्षे फिरत आहेत. ते पाहता घरी बसले तरी त्यांना एक-दीड लाखांनी निवडून द्यायला हवे. निवडणूक अगदी वन वे झाली पाहिजे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले पाहिजे. इतके सुंदर काम आ. लंके यांनी केले आहे. तुम्ही निर्धार करून कामाला लागा, असा सल्ला सुळे यांनी यावेळी दिला.