राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सुपूर्द
राजगुरूनगर- राजगुरूनगर नगरपरिषदअंतर्गत सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या नळ पाणीपुरवठा योजनेची संपूर्ण माहिती मिळावी व शहरातील रस्ते पाणी समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात या मागणीचे निवेदन खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना गुरुवारी (दि. 14) देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, शहराध्यक्ष सुभाष होले, माजी जीप सदस्य अरुण चांभारे, रोटरीचे माजी अध्यक्ष अविनाश कहाणे, माऊली करंडे, दिलीप लोखंडे, सुधीर येवले आदी उपस्थित होते.
राजगुरूनगर शहरामध्ये मंजूर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा योजनेची मंजुरी आदेश प्रत मिळावी, सध्या सुरू असलेल्या कामाची माहिती मिळावी, या योजनेच्या कामाचे टेंडर, वर्क ऑर्डर कोणत्या कंपनी वा ठेकेदार यांना दिले त्याची माहिती मिळावी, आतापर्यंत किती टक्के काम झाले, या कामाची बिले ठेकेदाराला अदा केली आहे का? महिनाभरापूर्वी भूमिपूजन झालेल्या गटार योजनेच्या कामाची माहिती मिळावी, शहरातील रस्ते खराब आहेत त्याची दुरुस्ती तात्काळ करावी, पाणीपुरवठा सुरळीत नसून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे शिवाय विकत पाणी घ्यावे लागत आहे म्हणून तात्काळ शुद्ध पाणीपुरवठा करावा.
दूषित पाण्यामुळे रोगराई पसरत असून त्यावर उपाययोजना तात्काळ करावी, कचरा डेपोसाठी तात्काळ जागा शोधावी, रस्त्यात पडलेला कचरा उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यावी, घंटागाडी वेळेत यावी, पिण्याच्या पाण्याच्या कामाची निविदा कोणत्या कंपनीला दिली आहे आणि त्याबदल्यात किती रक्कम अदा केली याची माहिती मिळावी, मागील तीन वर्षांतील पाणी योजनेच्या दुरुस्तीचा खर्च मिळावा आदी मागण्यांचा या निवेदनात उल्लेख केला आहे.