रुग्णालयांमध्ये करोना चाचणीसाठी रांगा

आस्थापनांना “निगेटिव्ह’ अहवाल बंधनकारक : वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल बंद करण्यात आले असून ज्या आस्थापना सुरू आहेत त्याठिकाणच्या कामगारांना व अस्थापना चालकांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोनाची चाचणी करण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयुक्त राजेश पाटील यांनी नवे आदेश लागू करत कडक निर्बंध लादले आहेत. अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. जे व्यवसाय, दुकाने सुरू आहेत, मात्र त्यांच्याकडील कामगारांचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. तरच त्यांना त्या आस्थापनेत काम करण्यासा परवानगी असणार आहे.

चाचणी अहवाल नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व चाचणी केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्याठिकाणी अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. ज्यांची अँटीजेन चाचणी निगेटिव्ह येत आहे, त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. मात्र चाचणीसाठी वाढलेल्या गर्दीमुळे वैद्यकीय यंत्रणेची धावपळ होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत चाचणी केली जाते. चाचणीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून रांगा लागत आहेत.

सामाजिक अंतराचा फज्जा
चाचणीसाठी रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन केले जात नाही. त्यामुळे संक्रमण आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन काटेकोरपणे होणे आवश्‍यक आहे.

किट्‌स संपल्या
शहरात महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये मोफत करोना चाचण्या केल्या जात आहेत. अचानकच गर्दी वाढल्याने अनेक रुग्णालयांमध्ये सकाळीच किट्‌स संपल्याचे पहायला मिळाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.