अमेरिकेत फूड बॅंकेसमोर रांगा

वॉशिंग्टन : करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत हाहाकार माजला आहे. करोनाचा संसर्ग अमेरिकेतील सर्वच राज्यांमध्ये झाला आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 20 हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखाच्या संख्येत इतरांना करोनाची बाधा झाली आहे. न्यूयॉर्क राज्याला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुले अमेरिकेतील काही भागांमध्ये नागरिकांना दोनवेळेस खाणे मिळवणेही कठीण झाले आहे. खाद्य पदार्थांच्या शोधासाठी हजारोजण वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लाबंचलांब रांगा दिसत आहेत.अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील एका फूड पॅन्ट्रीमध्ये किमान शंभर जणांच्या अन्नाची व्यवस्था केली जाते. एकाच दिवसात अन्नासाठी तिथे जवळपास नऊशे जणांनी अन्नासाठी रांग लावली होती. त्यामुळे परिस्थिती किती बिकट होत चालली आहे, याचा अंदाज करता येऊ शकतो.

अशीच परिस्थिती अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह अन्य राज्यांमध्ये आहे. परिस्थिती इतकी बिघडली की, खाद्य पदार्थांचे पॅकेट्‌स वितरीत करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना बोलवावे लागत आहे.
करोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांमध्ये खाद्यान्नांची मागणी अप्रत्यक्षपणे वाढत असल्याचे समोर आले आहे. संकटातील या काळात फूड बॅंकांना दुहेरी संकट झेलावे लागत आहे. एकीकडे लोकांकडून कमी प्रमाणात अन्नाचा पुरवठा होत आहे.

तर, दुसरीकडे हे अन्न वाटप करण्यासाठी स्वयंसेवक मिळत नाही. त्यामुळे फूड बॅंकांना नॅशनल गार्डची मदत घ्यावी लागत आहे. नॅशलन गार्डचे जवान गर्दी नियंत्रणासह फूड बॅंकांना संरक्षण पुरवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.