fbpx

भाजप श्रीनगरमध्ये ‘तिरंगा’ कधी फडकवणार?

शिवसेनेच्या मुखपत्रातून सवाल

मुंबई – भारत-चीन सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून तणाव निर्माण झाला आहे, अशीच परिस्थिती पाकिस्तानच्या सीमेवर प्रामुख्याने काश्‍मीरमध्ये आहे. यावेळी भारताने पाकिस्तानप्रमाणे चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज असल्याचा सल्ला शिवसेनेने केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे.

दरम्यान भारत-पाक सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान शहीद झाले, त्यापैकी दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या. या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? ते मुंबईत छठपूजेची मागणी करीत होते.

त्यातले काही मंदिरे उघडा, मंदिरे उघडा असे शंख फुंकत होते, तर काही जण मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्यासाठी प्रेरणादायी भाषणे ठोकीत होते. देशापुढील गंभीर स्थितीचे भान विसरल्यावर दुसरे काय व्हायचे? अशी टीका शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर आपल्या पक्षाच्या मुखपत्रातून केली आहे.

त्यातील अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे, त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार? ते स्पष्ट केले पाहिजे.
अग्रलेखात म्हटले आहे की, चीनने पेच टाकला आहे व आम्ही हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तानच्या कैचीत अडकून पडलो आहोत. कश्‍मीर खोऱ्यात शांतता नांदायला तयार नाही. सीमेवर धुमशान व आतमध्ये कमालीची खदखद आहे.

कश्‍मिरातील विषय गंभीर खरेच, पण चीनची आक्रमकता व घुसखोरीकडे डोळेझाक करून चालणार नाही. ज्या जोशात पाकिस्तानचे नाव घेऊन दम भरला जातो त्याच पद्धतीने चीनला दम देण्यापेक्षा कृतीची गरज आहे. वाटल्यास श्रीनगर,पाकव्याप्त कश्‍मीर वगैरेंवर भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांची नियुक्ती करावी, पण चिनी सैन्य चारही बाजूंनी धडका देत आहे त्यांना कधी रोखणार? चीनचे काय करणार? डोकलाममध्ये चिनी सैन्य घुसले.

हिमाचल, अरुणाचल, उत्तराखंडच्या सीमेवर ते घुसण्याच्या तयारीत आहे. लडाखच्या जमिनीवर ते मांड ठोकून बसले आहे. कुणाला त्याची चिंता आहे काय? असे सवाल शिवसेनेने उपस्थित केले आहेत.

भारतीय सैन्याने गेल्या चार दिवसांत पाकच्या हद्दीत गोळाबारूद फेकून त्यांच्या चौक्‍या वगैरे मारल्या, बंकर्स पेटवले हे खरे, पण आमच्या हद्दीत आमचेच जवान मारले गेले. त्यातील दोन जवानांच्या तिरंग्यात लपेटलेल्या शवपेट्या महाराष्ट्रात आल्या.

या शवपेट्या जवानांच्या गावी पोहोचल्या तेव्हा महाराष्ट्रातील भाजप पुढारी काय करीत होते? कश्‍मीर खोऱ्यातून तिरंग्यात लपेटलेल्या जवानांच्या शवपेट्या येत आहेत, पण श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवणे हा अद्याप गुन्हा ठरत आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याचा चंग ज्यांनी बांधला आहे त्यांनी श्रीनगरात तिरंगा कधी फडकवणार ते स्पष्ट केले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.