शिष्यवृत्तीसाठीच्या चाचणीतील प्रकार
पुणे – शिष्यवृत्ती परिक्षेच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या सराव परिक्षेत इंग्रजी व बद्धीमता चाचणीच्या प्रश्न पत्रिकेबरोबरच उत्तर सूची छापण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार उघडकीस आल्यावर परिक्षेला स्थगिती देण्यात आली असून, पुन्हा नव्याने परिक्षा घेण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून, दोषींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हावी, म्हणून शुक्रवारी (दि. 31) सराव परीक्षा घेण्यात आली. यावेळी पाचवीच्या इंग्रजी व बुद्धीमता चाचणी विषयाच्या परिक्षेसाठी प्रश्न पत्रिका वाटप केल्यानंतर, त्याला जोडूनच उत्तर सूची असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे काही ठिकाणी परीक्षा थांबवण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहू नयेत, असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या एकच गोंधळ उडाला. त्याबाबत जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना गटनेते देविदास दरेकर यांनी तक्रार दिल्यावर सीईओ यांनी तात्काळ पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. या प्रकाराची चर्चा शिक्षण विभागात सुरू असून शिष्यवृत्तीसाठी अशा पद्धतीने परीक्षा घेतली जाते, याबाबतच्या कारभारावर टीका केली जात आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हावी म्हणून, सराव परीक्षा घेणे बाबत तालुकास्तरावर कळविण्यात आले होते. त्याप्रमाणे तालुका स्तरावरून सराव परीक्षा प्रश्नपत्रिका छपाई करण्याऱ्या एजन्सीकडून प्रश्नपत्रिकेसोबत उत्तर सूची छपाई झाले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सराव परीक्षा थांबवण्यात आली व संबंधित छपाई दाराकडून पुन्हा प्रश्नपत्रिका छपाई करून, पुन्हा सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी