पिंपरी, दि. 20 (प्रतिनिधी) – उपचारासाठी दाखल करून घेतले जात नाही… कर्मचारी उद्धटपणे बोलतात… औषधांसाठी बाहेरच्या मेडिकलचा रस्ता धरावा लागतो. यासह असंख्य तक्रारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक करत असतात. त्यांची ही तक्रार थेट वरिष्ठांपर्यंत पोहोचावी म्हणून सारथीची मशीन रुग्णालयात बसविण्यात आली आहे. मात्र, ही मशीन तांत्रिक अडचणींमुळे बंद पडल्याने आम्ही तक्रार करायची कुठे, असा प्रश्न रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित करत आहेत.
वायसीएम रुग्णालयातील अल्प दरात मिळणाऱ्या चांगल्या उपचारामुळे या ठिकाणी रुग्णांची मोठी गर्दी होते. रुग्णालयात दिवसाकाठी एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. रुग्णांची मोठी गर्दी असल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धांदल उडत आहे. रुग्णांशी व्यवस्थित बोलणे गरजेचे असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून उद्धटपणे वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महापालिकेच्या वतीने सारथीची सुविधा देण्यात आली आहे.
त्यासाठी वायसीएम रुग्णालयात महत्त्वाच्या विभागासमोर सारथी मशीन ठेवण्यात आल्या आहेत. मात्र सध्या या मशिनच बंद अवस्थेत आहेत. तांत्रिक अडचणींमुळे मशीन बंद असल्याचे त्यावर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ही मशीन म्हणजे असून अडचण अन् नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
वायसीएम रुग्णालयात मुलीच्या जन्माचा दाखला घेण्यासाठी आलो होतो. मात्र, दाखला मिळविण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, या बाबत माहिती देण्यात आली नव्हती. शहराबाहेरून आलो असल्याने दाखला देण्याची विनंती करूनही तो मला देण्यात आला नाही. त्या बाबत तक्रार करायची कुठे हे कळत नव्हते. तसेच सारथीची मशिन होती. मात्र तीही बंदच होती.
– दिनकर सावंत, रुग्णांचे नातेवाईक.
सारथीवर रुग्णालयाबाबत येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी असते. तरी देखील रुग्णालयातील या मशिन का बंद आहेत, या बाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करू.
– डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, पीजी महाविद्यालय, वायसीएम.
तक्रार कशी करायची हेच माहीत नाही
रुग्णालयातील समस्यांबाबत तक्रार करायची कुठे, या बाबत अनेक रुग्णांना माहिती नाही. या मशीन लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर तक्रार करायची कशी या बाबत माहितीच नसल्याने अथवा त्याबाबत कोणतीही माहिती महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिली नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. या मशिनचा नेमका उपयोग कोणासाठी, असा प्रश्न रुग्ण व नातेवाईक उपस्थित करत आहेत.