प्रश्‍न केवळ आम्हालाच का विचारले जातात? अयोध्या प्रकरणी मुस्लिमांचा प्रश्‍न

नवी दिल्ली- अयोध्येतील राजकीयदृष्ट्‌या अत्यंत संवेदनशील रामजन्मभूमी – बाबरी मशिदीच्या वादाच्या प्रकरणात केवळ आपल्यालाच प्रश्न विचारण्यात येतात आणि हिंदूंना प्रश्न विचारले जात नाहीत, असा आरोप मुस्लिम पक्षांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला. मुस्लिम बाजूकडून बाजू मांडणारे वरिष्ठ विधीज्ञ ऍड राजीव धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनापिठापुढे हे गाऱ्हाणे मांडले.

“न्यायालयाच्यावतीने केवळ आम्हालाच प्रश्‍न विचारले जातात. आम्ही प्रत्येक प्रश्‍नाचे उत्तरही देत आहोत. पण हिंदूंच्या बाजूला प्रश्‍न विचारले जात नाहीत.’ असे ऍड धवन म्हणाले. पण त्यांच्या या आरोपाला राम लल्लाची बाजू मांडणारे ऍड. सी.एस. वैद्यनाथन यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा आरोप विनाकारण केला जात असल्याचे ऍड. वैद्यनाथन म्हणाले.

लोखंडी रेलिंग ठेवून, हिंदू आणि मुस्लिमांना वेगळे करण्याचा विचार होता आणि हिंदूंकडून राम चबूतरा, सीता रसोई, ‘भंडार गृह’ जेथे बाहेरील अंगणात प्रार्थना केली जात होती, त्या गोष्टीचे कौतुक केले पाहिजे, कोर्टाने सांगितले.

हिंदूंना त्या ठिकाणी जाण्याची आणि प्रार्थना करण्याचे फक्त नियमात्मक अधिकार होते. मात्र विवादित मालमत्तेवर त्यांचा मालकी हक्क आहे, असा याचा अर्थ होत नाही या ऍड. धवन यांच्या म्हणण्याचीही न्यायालयाने दखल घेतली.

“आपण म्हणता की त्यांना प्रार्थना करणे व त्यात प्रवेश करण्याचा अधिकार आहे. पण त्यामुळे आपल्या मालकीच्या हक्काला बाधा पोहोचते का ? असे न्यायालयाने विचारले. एखाद्या मालमत्तेवर अनन्य मालकी असल्यास, तिसऱ्या व्यक्तीस प्रवेश आणि प्रार्थना करण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असेही न्यायालयाने सांगितले.

दसऱ्यानंतरच्या आठवड्याभराच्या सुटीनंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या महत्वाच्या प्रकरणाच्या सुनावणीच्या अंतिम टप्प्याला आजपासून पुन्हा सुरुवात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.