प्रश्‍नचिन्ह

कोणत्याही भाषेमध्ये अनेक विरामचिन्हांचा उपयोग करावा लागतो. पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्‌गारवाचक, अल्पविराम आणि प्रश्‍नचिन्हदेखील! “प्रश्‍नचिन्हाबद्दल विचार करताना आपल्याला सदैव जाणवते, की अशी बरीच प्रश्‍नचिन्हे आपल्या आयुष्यात असतात,ज्यांची उत्तरे आपण अनंत काळापासून शोधत असतो.

साधी गोष्ट, बरेच दिवसांनी कुणी मैत्रिण भेटली की प्रथम आपण प्रश्‍नांची सरबत्ती करतो- काय कशी आहेस? मुले काय करतात? नोकरी चालू आहे का? सध्या काय करतेस? अगदी साधेच विचारपूस करण्याचे तंत्र. पण शेवटी किती प्रश्‍नच ना-या प्रश्‍नांच्या ओघात आपली मैत्रिणीची भेट संस्मरणीय होते. आणि भेटीत विचारपूस झाल्यानंतरही अनेक प्रश्‍न मनात उभेच राहतात.

तर अशा या प्रश्‍नांनी आपले रोजचे जीवनसुद्धा वेढलेले असते. भाषेची गंमतच अशी असते की प्रश्‍नांतूनच उत्तरे मिळतात आणि संभाषण चालू राहते. परंतु काही वेळा या प्रश्‍नांच्या सरबत्तीला उत्तर देणे अवघड जाते. काही लोकांना नसते प्रश्‍न विचारण्याचीही सवय असते जेव्हा त्यांची उत्तरे आपण देऊ शकत नाही अशा अवघड प्रश्‍नांची उत्तरे देण्यापेक्षा त्या व्यक्तीच आपण टाळू लागतो. तेव्हा संभाषणात प्रश्‍न विचारताना दुसऱ्याला अवघड वाटेल असे विचारू नये. उगाचच मला तुझी खूप काळजी वाटते, असे दाखवून लोक उत्तरे शोधत असतात, ती ही नको असलेली. तेव्हा ती तेवढी जरूर टाळावी.

संभाषण ही कला आहे आणि भाषेचे सौंदर्य अबाधित आहे. तेव्हा त्यामध्ये गोडवा राहील असे बघावे आपल्या बोलण्याचा रोख कुठे आहे, हे दुसऱ्याला कळते याची जाणीव ठेवावी. काही लोकांची सवय असते की दुसऱ्याला प्रश्‍नांनी हैराण करायचे आणि आपली उत्तरे मात्र गुलदस्त्यात ठेवायची. आपल्याला विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे महत्त्वाचे भाग किंवा व्यक्ती टाळून द्यायची; जेणेकरून दुसऱ्याला काही अर्थबोध होऊ नये. जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल जाणून घेण्याचा विचार करतो, तेव्हा स्वतःची ही पाटी उघडी ठेवायला हवी. परंतु खूप वेळा तसे आढळत नाही. काही माणसेच मोठ्या प्रश्‍नचिन्हांप्रमाणे असतात. त्यांच्याशी कसे वागावे हेच कळत नाही. काहींच्या चेहऱ्यावर नेहमी मोठे प्रश्‍नचिन्ह असते. ज्यांच्याशी संवाद तर दूरच, पण साधे संभाषणही अशक्‍य होते.

प्रश्‍नचिन्ह हे महत्त्वाचे आहे. आयुष्यात प्रश्‍न पडायला हवेत आणि त्यांची उत्तरेही स्वतःची स्वतः शोधायला हवीत. म्हणजे आपलीच प्रगती होते. पण प्रश्‍नांनी आयुष्य निरस नको व्हायला त्यांची उत्तरे शोधता शोधता माणूस पण नको हरवायला.

शाळेपासूनच हे प्रश्‍न पेपरात येऊन आपल्या आयुष्यात शिरकाव करतात. एका वाक्‍यात उत्तरे, कारण द्या, सविस्तर उत्तरे लिहा, व्याकरणावरील प्रश्‍न, निबंध या प्रश्‍नांनी शालेय जीवनापासूनच आपले बालपण हिरावून घेतलेले असते. मोठेपणी नेमके ऑप्शनला टाकलेले प्रश्‍नच पेपरात येतात आणि आपली फजिती करतात. अगदी आयुष्यभर साध्या साध्या प्रश्‍नांनी आपले आयुष्य भरलेले असते. त्यांची उत्तरे कधीच मिळत नाहीत.

– आरती मोने

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.