खेड तालुक्यात 91 ग्रामपंचायतींचा आखाडा 2020मध्ये तापणार
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल 2020मध्ये वाजणार असून सरपंचपदाच्या आरक्षण सोडत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केली जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम प्रक्रीया सुरू झाल्यामुळे सरपंचपदाचे आरक्षण काय निघणार याचे ताळेबंद मांडले जात असून पारावर गप्पा रंगल्या आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर लोकनियुक्त सरपंचपदाची निवडणुकीबाबत रद्द करण्याबाबत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केल्यामुळे आगामी ग्रामपंचायतीचे सरपंचपद लोकांमधून की निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खेड तालुक्यातील आगामी वर्षातील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 91 ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमातंर्गत प्रभागरचना, प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन आणि वॉर्डनिहाय आरक्षण कार्यक्रम शुक्रवारी (दि. 20) ते शनिवार (दि. 21 मार्च 2020) या कालावधीत करण्यात येणार, असल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
या खेड तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. 20) पर्यंत संबंधित गावाचे गुगल मॅपच्या सहाय्याने नकाशे तयार करुन नियुक्त तलाठी आणि ग्रामसेवकामार्फत सोमवार (दि. 30) पर्यंत प्रत्यक्ष गावात स्थळपाहाणी करून प्रभाग पाडणे, हद्दी निश्चित करणे, अनुसुचित जाती, जमातीचे आरक्षण निश्चित करणे, 10 जानेवारी 2020 पर्यंत प्रस्तावाला तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रारुप प्रभागरचनेला मान्यता देणे, 20 जानेवारीपर्यंत प्रारुप प्रस्तावांची आवश्यक दुरुस्ती करणे, 30 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातून सुचवलेले बदल करुन प्रारुप प्रभागरचना आणि आरक्षणाला मान्यता देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षणे करण्यासाठी 1 ते 4 फेब्रुवारीपर्यंत विशेष ग्रामसभा घेऊन प्रभाग रचनेनुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदार 7 फेब्रुवारीपर्यंत प्राप्त प्रारुप प्रभाग रचना आलेल्या सूचना, हरकती मागवण्यासाठी सुचना प्रसिद्ध करुन प्रभागरचनेवर स्थानिक नागरिकांना 14 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदवता येईल.
20 फेब्रुवारीपर्यंत आलेल्या नागरिकांच्या हरकती उपविभागीय अधिकारी तथा प्रांत यांच्याकडे सादर करणे. त्यांनतर आलेल्या सर्व हरकतीवर आणि सुचनावर 29 फेब्रुवारीपर्यंत सुनावणी घेण्यात येणार आहे. सूचना आणि हरकतीवर प्रांत यांच्या अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे 11 मार्चपर्यंत सादर केले जाणार आहे.
या गावांमध्ये उडणार धुराळा
खेड तालुक्यातील वेताळे, मोहकल, कमान, आखरवाडी, तळवडे, कडूस, रानमळा, दोंदे, साबुर्डी, बिबी, कडधे, कान्हेवाडी बुद्रुक, वडगाव पाटोळे, चांडोली, पांगरी, पाडळी, टाकळकरवाडी, जऊळुके बुद्रुक, वरची भांबुरवाडी, राक्षेवाडी, तुकईवाडी, ढोरे भाबुंरवाडी, जैदवाडी, खरपुडी बुद्रुक, रेटवडी, खरपुडी खुर्द, वाकी बुद्रुक, काळुस, पिपंरी बुद्रुक, आसखेड खुर्द, चांदुस, किवळे, कोरेगाव बुद्रुक, कुरकुंडी, शेलू, वराळे, सावरदरी, गोनवडी, सांगुर्डी, कान्हेवाडी तर्फे चाकण, चिंबळी, गोलेगाव, कुरुळी, महाळुंगे, मोई, बिरदवडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, शिंदे, वासुली, रासे, भोसे, मरकळ, कोयाळी तर्फे चाकण, चऱ्होली खुर्द, धानोरे, केळगाव, चिंचोशी, वाकळवाडी, चिंचबाईवाडी, पूर, कनेरसर, गोसासी, वाफगाव, निमगाव, दावडी, करंजविहिरे, शिवे, गडद, औदर, वाजवणे, कुडे बुद्रुक, येणिये बुद्रुक, कुडे खुर्द, आंबोली, औंढे, पाळु, अहिरे, हेंद्रुज, वांद्रा, विऱ्हाम, तोरणे बुद्रुक, घोटवडी, धामणगाव बुद्रुक, कळमोडी, खरोशी, शिरगाव, नायफड, टोकावडे, भोरगिरी.
लोकनियुक्त निवड प्रक्रियेचे समर्थन
लोकनियुक्त सरपंचपद हे सर्वच मतदारांमधून निवडून आल्यामुळे विकासाच्या गतीबरोबर गटा-तटाचे राजकारण होत नाही, त्यामुळे गावच्या सर्वांगीण विकासकामांमध्ये होणारा गटबाजीचा अडथळा दूर होण्याबरोबरच दर्जेदार विकासकामे होत असल्याची प्रतिक्रिया लोकनियुक्त सरपंचानी व्यक्त करून युती सरकारच्या काळात सरपंचपदाबाबतच्या निवड प्रक्रियेचे समर्थन केले आहे.