दिवसभर सुगीचे काम अन्‌ संध्याकाळी पाण्यासाठी रांग

पेडगांव येथील महिला व ग्रामस्थांचा संताप

अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार
स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांचा कालावधी होवूनसुध्दा रस्ते, पाणी आदी मुलभूत सुविधा पुरेश्‍याप्रमाणात मिळत नाहीत. येत्या चार दिवसात वाढीव टॅंकर खेपाची मागणी पुर्ण केली नाही तर ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकील असा इशारा युवा कार्यकर्ते गणेश जगदाळे व सचिन निकम यांनी दिला आहे. यावेळी अशोकराव जगदाळे, निवृत्ती जगदाळे, सोपानराव जगदाळे, ब्रम्हदेव जगदाळे आदी उपस्थित होते.

वडूज – सध्या एका बाजूला निवडणूकीची धामधूम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला खटाव तालुक्‍यातील पेडगाव गावातील महिला व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र भटकंती करावी लागत आहे. ऐन सुगीच्या दिवसात दिवसभर राबून हंडाभर पाण्यासाठी रात्री-अपरात्री रांग लावावी लागत आहे.

याबाबतची माहिती अशी, वडूज या तालुक्‍याच्या गावापासून सुमारे 5 कि.मी. अंतरावर पेडगांव हे सुमारे 2 हजार 500 लोकसंख्येचे गाव आहे. मुख्य गावासह सुभाषनगर, जांभळीचा मळा, कुशाबानगर, चव्हाणवस्ती, बावदरा, जगदाळे वस्ती, डोने वस्ती, बौध्द व मातंग वस्ती अशा सात ते आठ वस्त्या आहेत. गावामध्ये सुमारे दीड हजारांच्या आसपास पशुधन आहे. या गावात यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. टंचाई परस्थिती लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी व जागृत कार्यकत्यांनी तातडीने टॅंकर मागणीचा प्रस्ताव पाठवला. मात्र लाल फितीच्या दफ्तर दिरंगाईमुळे टॅंकर मंजूरीस महिनाभराचा कालावधी लागला.

सध्या गावात 12 हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरच्या तीन खेपा होत आहेत. हे पाणी सार्वजनिक विहीर व पाण्याच्या टाकीत ओतले जाते. त्यामुळे चार दिवसातून एकदा सार्वजनिक नळाला पाणी येते. एका जागेवर सार्वजनिक टाकीतून मोठ्या प्रमाणात पाणी सुटत असल्याने रात्री, अपरात्री महिला, मुली व वृद्ध लोकांना पाण्यासाठी रांग लावावी लागत आहे. एका बाजूला शेतात दिवसभर काबाडकष्ट करायचे व दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी रात्र-रात्र रांग लावायची. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाणीखेपा वाढवून प्रतिदिन 68 हजार लिटर पाणी द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अद्याप प्रशासनाकडून त्यावर कारवाई नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.