प्रत्येक वडिलांचं आपल्या मुलांविषयी एक स्वप्न असतं… त्या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येक पिता आपापल्या परीने काबाडकष्ट करतो… जिथे अजूनही मुलींच्या जन्मानंतर नाकारणारे पालक आहेत, तिथेच आपल्या दोन्ही मुलींचा अभिमान बाळगणारा, मुलीने आपलं नाव देशातच नव्हे तर जगात करावं, हे स्वप्न उराशी बाळगून तिच्या चौथ्या वर्षांपासून तिला खेळाच्या मैदानावर उतरवून तिला मार्गदर्शन करणारा पिता विरळाच. एवढेच नव्हे तर ती उच्च दर्जाची टेनिसपटू व्हावी यासाठी लिएन्डर पेस, राफेल नदाल यासारख्या टेनिस जगतातीत महान खेळाडूंकडे तिला प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे धाडस करणारा ध्येयवेडा पिता पाहून कोणाचाही ऊर अभिमानाने भरून येईल… आपल्या पित्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 16 वर्षीय स्मिताही तितक्याच आत्मीयतेने आणि कठोर परिश्रम घेत टेनिस जगतात उंच भरारी घेण्यासाठी वाटचाल करत आहे.
बोवाल्हेकरवाडीत राहणारे स्मिताचे वडील खरंतर स्पोर्टसमन होते. मात्र त्यांनी कालांतराने विविध क्षेत्रातील उद्योग सुरू केले. त्यांचे “स्मित कन्स्ट्रक्शन्स’ ही कंपनी सुपरिचित आहे. याशिवाय लॅण्ड डेव्हलपर्स, गुळाचा कारखाना, दुग्ध व्यवसाय अशा विविध व्यवसायातून त्यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखविले आहे. हा सगळा व्याप वाढविण्यामागे एकच कारण दडले आहे, ते म्हणजे मुलींचे भविष्य.
भरत आणि सुप्रिया या दाम्पत्याला दोन कन्यारत्नं आहेत. थोरली स्मिता तर धाकटी अनन्या. भरत हे स्वत: कराटेपटू असल्यामुळे त्यांनी स्मिताला बालवयापासूनच कराटेचे प्रशिक्षण दिले. वयाच्या चौथ्या वर्षापासून स्मिताचा कराटेचा सराव सुरू झाला. तिच्यातील चपळाई थक्क करणारी होती. या जोरावर तिने वयाच्या पाचव्या वर्षी पहिले सुवर्णपदक पटकावले. यानंतर भरत यांना “लॉन टेनिसबद्दल माहिती मिळाली. हा खेळ खर्चिक असला तरी आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करण्याबरोबरच मान-सन्मान, पैसा, लौकिक प्राप्त करून देणारा असा हा खेळ आहे. या खेळात स्पर्धक कमी असल्यामुळे स्मिताला उज्ज्वल भविष्य प्राप्त होऊ शकते, या कारणांमुळेच भरत यांनी स्मितासाठी लॉन टेनिसची निवड केली.
चिंचवड येथील अर्जुन पुरस्कार विजेते संदीप कीर्तने यांच्याकडे तिने वयाच्या सातव्या वर्षांपासून टेनिसचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. चार वर्षे कसून सराव केला. अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत “टॉप रैंकिंग’मध्ये पोहोचली.
स्मिताला घरी आल्यानंतरही सराव करता यावा, यासाठी भरत यांनी सर्व सुविधायुक्त गवत, माती आणि कठीण पृष्ठभाग असणारे तीन वेगवेगळ्या प्रकारचे टेनिस कोर्ट तयार करून घेतले. क्लासवरून आल्यानंतर ती घरच्या कोर्टवर आठ तास सराव करते. इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनच्या “टॉप रॅंकिंग’मध्ये येण्यासाठी चार तास शारीरिक व्यायाम आणि चार तास टेनिसचा सराव, असा तिचा सध्याचा दिनक्रम आहे. न्यूझीलंडमध्ये खेळाडूंना टेनिसचे प्रशिक्षण देणारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रणजित शिंदे यांनी सुमारे अडीच वर्षे त्यांनी स्मिताला प्रशिक्षण दिले. या काळात तिने न्यूझीलंडला जाऊनही प्रशिक्षण घेतले. टेनिस खेळातील बारकावे, खेळाचे आंतरराष्ट्रीय नियम, अटी याबाबत तिने सर्व गोष्टी शिकून घेतल्या. यानंतर पुण्यात झालेल्या एका कॅम्पमध्ये भरत यांनी स्मिताला पाठविले. स्पेनच्या प्रशिक्षकाकडून स्मिताला प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. स्मिताचा खेळ पाहून त्या प्रशिक्षकाने तिला स्पेनला बोलावले. भरत यांनीही देखील संधी सोडली नाही. मुलीच्या करिअरपुढे पैशाचा विचार न करता भरत यांनी स्मिताला घेऊन स्पेन गाठले. तीन महिने स्पेनमध्ये प्रशिक्षण घेऊन स्मिता मायदेशी परतली.
पुण्यात संदीप कीर्तने यांच्याकडे आणि घरच्या मैदानावर स्मिताचा सराव सुरूच होता. 2013 पर्यंत स्मिताने टेनिसच्या सर्व राज्यस्तरीय स्पर्धा गाजविल्या. त्यानंतर पुढील तीन वर्षे ती राष्ट्रीय स्तरावर खेळली. वयाच्या 14 व्या वर्षांपासून ती इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनतर्फे ज्युनियर व सिनियर गटातून खेळत आहे. एखाद्या खेळात नैपुण्य मिळवायचे असेल तर त्या क्षेत्रातील नामवंत प्रशिक्षकांकडून स्मिताला प्रशिक्षण मिळावे, यासाठी भरत वाल्हेकर नेहमीच प्रयत्नशील राहिले. 2017 मध्ये ते मुंबई येथे महेश भूपतीला भेटले. स्मिताचा टेनिसमधील उत्कृष्ट कामगिरीचा चढता आलेख पाहून महेश भूपतीदेखील अवाक् झाले. त्यांनी भरत यांच्या समोरच आंतरराष्ट्रीय टेनिसपटू व प्रशिक्षक लिएंडर पेसला फोन लावून स्मिताबद्दल माहिती दिली.
एवढंच नव्हेतर, तर तिला प्रशिक्षण देण्याबाबतही सांगितले. लिएंडर पेस ज्या ज्यावेळी मुंबईत असतात, तेव्हा स्मिता त्यांच्याकडे जाऊन टेनिसचे प्रशिक्षण घेते. आता “लॉन टेनिस’चे बादशहा राफेल नदाल यांच्या स्पेनमधील ऍकॅडमीत राहून प्रशिक्षण घेण्याची संधी स्मिताला मिळाली आहे. सहा महिन्यांसाठी ती स्पेनला जाणार आहे. 2024 मध्ये होणारी ऑलिंम्पिक तसेच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचे तिचे ध्येय आहे. आज वडिलांच्या भक्कम पाठिंब्यावर तिची दमदार वाटचाल सुरू आहे. खेळाबरोबरच ती बीएसस्सीचे शिक्षणदेखील घेत आहे. मुलीला चांगल्या दर्जाचा आहार मिळावा, यासाठी भरत वाल्हेकर यांनी सेंद्रिय शेती विकसित केली आहे. आपल्या शेतीतील चांगल्या दर्जाचा भाजीपाला, फळभाजी, दूध असा सकस आहार ते स्मिताला देत असतात.
माझी मुलगी माझ्या कुटुंबाचंच नव्हे, तर देशाचं नाव उज्ज्वल करेल, हा विश्वास भरत वाल्हेकर यांच्या कृतीतून प्रकट होतो. मुलीला लॉन टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोच्चस्थानी झळकताना पाहायचं आहे, हे त्यांचं स्वप्न स्मिता नक्कीच सत्यात उतरवणार, यात शंका नाही.