पाणीप्रश्‍नी बंद खाणीचा उतारा?

वाघोली परिसराला लाभकारी : योजनांवर कोट्यवधींची होईल बचत

– दत्तात्रय गायकवाड

वाघोली – येथील हद्दीतील गेले 30 वर्षांपासून सुरु असलेला खाण व्यवसाय बंद झाला आहे. शासनाने खाण मालकांना त्यांच्या जागेचा मोबदला देऊन खाणी ताब्यात घेतल्यास पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. शासनाचा पाणीपुरवठा योजनांवर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चात बचत होऊ शकते.

दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शासनाकडून गावोगावी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, शेततळे आदी विविध योजना राबवून जलसिंचनावर कोटी रुपये खर्च केले जात आहेत. अनेक गावांमध्ये पेयजल योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, पाणीटंचाईमुळे बहुतांश योजना बंद पडलेल्या दिसून येतात. वाघोली गाव उपनगर म्हणून ओळखल्या जात आहे. दिवसेंदिवस वाढते उद्योग, लोकसंख्या आदी कारणांमुळे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शासनाच्या वतीने व स्थानिक संस्थांकडून पुरवठा विहीर, पाण्याची उंच टाकी व वितरण व्यवस्था अशा विविध उपाययोजनांद्वारे कोटी रुपये खर्च करून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न केले जात आहे.

खाणीमुळे पाण्याचा प्रश्‍न लागू शकतो मार्गी
वाघोलीतील बहुतांश खाणी बंद आहेत. त्याची खोली 20 ते 60 फूट आहे. खासगी मालकीच्या खाणी शासनाने ताब्यात घेतल्यास पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. बंद खाणीमुळे जागा मालकांना याचा काही उपयोग होत नाही. खाणी खोल असून त्यामध्ये काळी माती भरून शेतीसाठी उपयोगात आणण्याचा प्रयत्न केला तरी तो खर्चिक आहे. त्यामुळे शासनाने खाण मालकाला जमिनीचा योग्य मोबदला दिल्यास पाणीसाठ्याचा स्त्रोत म्हणून खाणींचा उपयोग केला जाऊ शकतो. लोणीकंद परिसरातील बंद पडलेल्या खाणींचा यासाठी उपयोग केल्यास पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.