पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात विदेशातून आलेल्या ९२ तर बाहेगावातून आलेल्या ८ हजार १४९ जणांचा क्वारंटाईन पूर्ण झाला आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली. बारामती शहरात कोरोना विषाणूचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार शहरातील ४४ विभागातील नागरिकांना घरपोच सर्व सुविधा प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. बारामती तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती शहर आणि तालुक्यात १० हजार २८२ जणांचा क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ८ हजार १४९ नागरिकांना १४ दिवसांचा क्वारंटाईन पूण झाला आहे.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे सुरु असल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांनी दिली. तर समर्थनगर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या तीन नातेवाईकांचे नमुने पुण्याच्या नायडू रुग्णालयात तपासणीसाठी पाठवल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, देशात सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात करोना संकट कमी व्हायला तयार नाही. करोना रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. सोमवारी दुपारपर्यंत यात आणखी ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या २ हजारांच्याही पुढे गेली आहे.