टान्झानियातील दहा जणांचीही तपासणी : पुढील तीन दिवस खडकी परिसर बंद
पुणे – खडकी कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीत एक व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 14 जणांसह 32 जणांची सोमवारी करोना तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर पुणे शहरात बेकायदेशीर राहणाऱ्या टान्झानियातील नागरिकांचीदेखील तपासणी करण्यात आली. या सर्वांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आता 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.
खडकी येथे रविवारी एक जण करोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुढील तीन दिवस खडकी परिसर शंभर टक्के बंद ठेवण्याचे आदेश बोर्डाने दिले आहे. या पार्श्वभूमीवर आज सबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची दापोडी येथील पालिकेच्या रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर इतर ही संशयित व्यक्तींच्या विविध रुग्णालयांमध्ये तपासणी केल्यानंतर या सर्वाना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे.
पीएमपीच्या तीन बसेसमधून या सर्वांना खराडी येथील क्रीडा संकुलमध्ये क्वारंटाइन करून ठेवण्यात आले आहे. त्यातील टान्झानियामधील नागरिकांना पोलीस बंदोबस्तामध्ये नेण्यात आले आहे. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते टुरिस्ट व्हिसावर भारतात राहत होते.