533 अभियंते विलगीकरण कक्ष सांभाळणार ‘क्‍वारंटाइन इंजिनिअर’

– गणेश आंग्रे

पुणे – शहरातील करोनाबाधित आणि संशयितांची सध्याची आणि भविष्यात होणारा संभाव्य उद्रेक यांचा विचार करता क्‍वारंटाइन सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. हे लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने सरकारच्या विविध विभागांतील 533 अभियत्यांना क्‍वारंटाइन सेंटरच्या सुविधेसाठी नियुक्‍त केले.

शहरात लॉकडाऊन शिथिल झाले आणि करोनाबाधितांची दैनंदिन संख्या 200च्या पार पोहोचली. त्याचबरोबर बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची संख्या झपाट्याने वाढली. अशा परिस्थितीत या संशयितांना क्‍वारंटाइनसाठी सेंटर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. तर, दुसरीकडे क्‍वारंटाइन सेंटरमध्ये सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने सेंटरची संख्या वाढविली असून तेथील सनियंत्रण म्हणून शासनाच्या विविध खात्यांमधील 533 अभियंत्यांची नेमणुकीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूजल

सर्वेक्षण विकास यंत्रणा, मोटार व्हेईकल विभाग, जिल्हा परिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या विभागांतील हे अभियंते आहेत. यामुळे करोना बाधितांच्या मदतीला आता अभियंते आले असून ते रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था, आवश्‍यक त्या सुविधा देणे आदी जबाबदारी पार पाडणार आहेत.

अभियंत्यांवर राहणार ही जबाबदारी
– क्‍वारंटाइन सेंटरचे सनियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी
– सेंटरमधील संशयित व्यक्‍तींच्या नोंदी
– सेंटरमधील व्यक्‍तींसाठी जेवणाची व्यवस्था
– क्‍वारंटाइन सेंटरचे नियोजन
– क्‍वारंटाइन सेंटरची स्वच्छता, आवश्‍यक ती देखभाल दुरुस्ती
– अभियंत्यांची सेवा महापालिकेकडे अधिग्रहीत

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिकेला कनिष्ठ अभियंता यांची आवश्‍यकता भासली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांची आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथ रोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी 533 अभियंत्यांची सेवा पुणे महापालिकेकडे अधिग्रहीत केली आहे. पालिका आयुक्‍त यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या अभियंत्यांनी कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.