करोनाबाधित महिलेचा मोबाइल नंबर मिळवत सुरक्षारक्षकाकडून त्रास
सतत मिस कॉल आणि अश्लील शब्दांचा वापर
पुणे – क्वारंटाइन केंद्रात उपचार घेणाऱ्या महिलेस मध्यरात्री त्रास देणाऱ्या सुरक्षारक्षकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ही घटना 16 जुलै रोजी सिंहगड रस्ता परिसरात घडली. याप्रकरणी एका संघटनेने आवाज उठवल्यावर गुन्हा दाखल झाला.
लोकेश दिलीप मते (वय 30, रा. धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका क्वारंटाइन केंद्रामध्ये करोनाबाधित महिलेवर उपचार सुरू होते. केंद्रात त्या एकमेव महिला रुग्ण होत्या. दरम्यान, तेथे लोकेश मते हा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. 16 जुलै रोजी रात्री महिला तिच्या खोलीत आराम करत होती. त्यावेळी मते त्या खोलीत गेला, सुरक्षेच्या कारणास्तव खोलीत आल्याचे सांगून त्याने महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर रात्री एक वाजता त्याने महिलेच्या मोबाइलवर मिस्ड कॉल केला. काही वेळाने “मॅडम आपल्याला काही अडचण असल्यास सांगा’ असा मेसेज करून महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पहाटे दोन वाजल्यापासून सकाळपर्यंत तो सतत दरवाजा ठोठावून महिलेस त्रास देत होता. तसेच, फोनवरदेखील अश्लील शब्दात बोलत होता.
या प्रकारामुळे महिला घाबरली. तिचे पतीही दुसऱ्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल आहेत. यामुळे तिने रात्री आई-वडिलांना फोन करून माहिती दिली. ते दुसऱ्या दिवशी तिच्या मदतीला दाखल झाले. तिने पहाटे हा प्रकार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही सांगितला, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, महिलेने या प्रकाराबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे व शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांना सांगितले. त्यांनी याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांना प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांनी चौकशी करून व महिलेची फोनद्वारे फिर्याद घेऊन मतेविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर त्यास अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मधुरा लोणारे करीत आहेत.
कोविड सेंटरमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षारक्षकाला कामावरून काढले आहे. तो ठेकेदारामार्फत नियुक्त करण्यात आला होता. संबंधित ठेकेदारालाही याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही विकृती असून, असे प्रकार होऊ नयेत यासाठी अधिक काळजी घेतली जाईल.
– संदीप कदम, प्रमुख, सुरक्षा विभाग, महापालिका