उद्योजकतेवर आधारित वेबिनार : केंद्रीय मंत्री गडकरी यांचा सल्ला
पुणे – मत्सव्यवसाय, मधमाशी पालन, मशरुम उत्पादन, बांबू उत्पादन आणि त्याच्याशी संबंधित लघुउद्योगांना जागतिक बाजारपेठेत खूप मागणी आहे. त्यासाठी दर्जा, संशोधन आणि प्रयोगशिलता या त्रिसूत्रींचे पालन करणे आवश्यक आहे, असे मत केंद्रीय वाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे (एवायसीएम) “एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) क्षेत्रातील नव्या संधी’ या विषयावरील वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. या चर्चेत “एनवायसीएस’चे अध्यक्ष प्रकाशचंद्र साहू आणि चेअरमन राजेश पांडेदेखील सहभागी झाले.
गडकरी म्हणाले, “अन्य देशांपेशा भारतात नैसर्गिक स्रोत मुबलक आहेत. भारतीय संस्कृतीवर आधारित पांरपरिक कलात्मकता आपल्यात भिनलेली आहे. त्याच गुणांचा मेळ घालत आपण आपल्यातील उद्यमशिलता विकसित केली, तर अनेक संधी आपल्यापुढे नतमस्तक होतील. कोणताही व्यवसाय हा कमी दर्जाचा नसतो. निर्यातीचा दर्जा टिकवत पॅकेजिंगसह इतर बाबींवर लक्ष केंद्रित केले, तर जागतिक बाजारपेठेची दारे खुली होतात. निर्यात वाढून आयात कशी कमी होईल, या दृष्टीने काम सुरू आहे. राजेश पांडे यांनी वेबिनारच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करीत प्रास्ताविक केले. प्रकाश चंद्र साहू यांनी आभार मानले.