पुणे -जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये बुधवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले होते. शिवाय, सोशल डिस्टनसह करोना बचावात्मक नियम पाळून पर्यटकांना प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शनिवारवाडा पाहण्यास येणाऱ्यांना क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाइन तिकिटे देण्याची व्यवस्था केली होती. परंतु, क्युआर स्कॅन होत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, ऑनलाइन तिकिटे काढण्याबद्दल माहिती नसलेल्यांना रखवालदार त्याविषयी माहिती देत होते. क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टनसचा नियम पाळला गेला नाही. येथील सॅनिटीरायझरही संपले होते. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते.
पहिल्यादिवशीच ऑनलाइन तिकिटे मिळण्यास उशीर झाल्याने अनेक पर्यटक शनिवारवाडा न पाहताच निघून गेले. त्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढल्यास पुरात्तव विभागाच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. यावर लवकरच उपाय काढावा, अशी मागणी नाराज पर्यटकांनी केली आहे.
करोनासंबंधि नियमांची काटेकोर अमलबजावणी बंधनकारक
करोना पार्श्वभूमीवर ऐतिहासिक वास्तू, किल्ले, स्मारके, संग्रहालये दि.31 मार्चपासून बंद आहेत. पुणे जिल्ह्यात विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभलेला आहे. या ठिकाणी दरवर्षी दुर्गप्रेमी, पर्यटक भेटी देत असतात. यामुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. आता ही सर्व ठिकाणे खुली करण्यात येणार असल्याने, तेथे मानक कार्यप्रणालींचा अवंलब करणे बंधनकारक असणार आहे. आवश्यक शारिरिक अंतर बाळगणे, मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात स्वच्छ करणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधिताविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.