टोक्यो – भारतीय बॅडमिंटन चॅम्पियन आणि मागील रिओ-ब्राझिल ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिने आपल्या महिला एकेरीच्या बॅडमिंटनच्या पहिल्या सामन्यात इस्रायलच्या सेनिया पॉलीकारपोवा हिच्यावर 21-7 21-10 अशी मात करत आपला पहिला सामना जिंकला आहे.
टोक्यो क्रीडाग्रामामध्ये आज भारतीयांसाठी अनेक सामन्यांची पर्वणी आहे. त्यातील पहिल्या लढतीत महिला एकेरीच्या सामन्यात वर्ल्ड चॅंपियन सिंधूने एकतर्फी सामना जिंकताना इस्रायलच्या सेनियाला निष्प्रभ केले. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत सिंधूने सेनियाला चुका करायला भाग पाडत गुणांची कमाई केली.
सुमारे 28 मिनिटे चाललेल्या या लढतीचे दोन्ही गेम्स अगदी आरामात जिंकत सिंधूने आपले वर्चस्व आणि दर्जा सिद्ध केला आहे. मूळची रशियात जन्मलेली सेनिया पॉलीकारपोव्हा इस्रायलमध्ये स्थायिक असून त्याच देशाकडून खेळताना तिने युरोपियन बॅडमिंटनमध्ये विविध विजेतेपदे मिळवली आहेत.
सिंधूच्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.