ओडिशातील रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे भारतात भेट देण्यासाठी आलेल्या दोन रशियन पर्यटकांचा आठवडाभरात मृत्यू झाला. रशियातील सर्वाधिक मानधन घेणारे राजकारणी पावेल अँटोनोव्ह यांचा शनिवारी ओडिशातील हॉटेलमधील खोलीच्या खिडकीतून पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. याच्या दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारीच भारतात एका पार्टीदरम्यान त्यांच्या एका मित्राचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
पावेल अँटोनोव्ह हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या समर्थक पक्षाशी संबंधित आहेत. मात्र, युक्रेनसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी पुतीन यांच्यावर अनेक वेळा टीका केली होती. अँटोनोव्ह हे रशियाच्या व्लादिमीर क्षेत्राचे खासदार होते आणि 2019 मध्ये रशियाचे सर्वाधिक पगार घेणारे राजकारणी होते. त्यांचा ६५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते भारतात आले होते.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून अँटोनोव्हचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 65 वर्षीय पावेल अँटोनोव्ह शनिवारी हॉटेलच्या बाहेर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आणि त्याचा सहप्रवासी व्लादिमीर बिदेनोव 22 डिसेंबर रोजी त्याच हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळला. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरच्या खोलीत तो बेशुद्धावस्थेत पडला होता आणि त्याच्याजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या होत्या. त्याला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.