भोर आगारातील वाहक-चालकावर काळाचा घाला

पंक्‍चर चाक बदलताना वाहनाने धडक दिल्याने दोघांना मृत्यू

भोर- बावधन गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 15) पहाटे एसटी बसचे पंक्‍चर झालेले चाक बदलत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने भोर आगाराचे बस चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला. वाहक व चालक यांच्यावर काळाने अचानक घाला घातल्याने भोर आगारातील कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

भोर एसटी आगारातील एसटी सोमवारी (दि. 14) रात्री बस मुंबई सेंट्रल येथून भोरकडे येत होती. त्यावेळी बावधन गावच्या हद्दीत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास बसचे चाक पंक्‍चर झाले. त्यामुळे बस थांबवून चालक मोहन बांदल (वय 55, रा. महुडे, ता. भोर) व वाहक शंकर चव्हाण (वय 35, रा. भोळी, ता. भोर) हे चाक बदत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने दोघांना उडवले. यामध्ये मोहन बांदल यांचा जागीच मृत्यू झाला तर शंकर चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु, त्यापूर्वीच त्यांचा मुत्यू झाला असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

वरंधाघाट रस्त्यावर एसटी बस बेकडाऊन झाली असता प्रसंगाधान दाखवून मोहन बांदल यांनी 60 प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या धाडसाची नोंद घेऊन भोर तालुका पत्रकार संघाने पत्रकार दिनी आदर्श वाहन चालक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. तर वाहक शंकर चव्हाण यांच्यामागे पत्नी, आई, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीवेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave A Reply

Your email address will not be published.