मुंबई – शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आपला हा खोटा व्हिडीओ ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि युवासेनेच्या कार्यकर्त्यांनीच व्हायरल केल्याचा थेट आरोप त्यांनी केला असून, सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलाच वाद चालू झाला आहे.
यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही सवाल केले आहेत. कुठल्याही पक्षाची महिला असो तिची बदनामी होता कामा नये. तिच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. तिचं व्यक्ती स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ नये, असं सांगतानाच व्हायरल व्हिडीओसाठी आपल्याकडे कलमं नाहीत. पण या प्रकरणात तुम्ही चुकीची कलमं लावली आहेत.
तो व्हिडीओ मॉर्फ केलेला नाही. या प्रकरणात जी कलमं लावली आहेत. ती लैंगिक कृतीचा प्रसार आणि प्रचार करणारी आहेत. याचा अर्थ शीतल म्हात्रे यांनी पब्लिक प्लेसमध्ये असभ्य कृती केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृती केल्याचं कलम लावा’. अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शीतल म्हात्रे यांची संतापजनक प्रतिक्रिया…
त्यांनी एक व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. शीतल म्हात्रे आपल्या व्हिडिओत म्हणतात की ‘राजकारणामध्ये मला अनुभव आहे की पुरुषी जो विचार कसा असतो, एखादा पुरुष राजकारणातील स्त्री कसा वागवतो माझ्या आत्मसन्मानासाठी मी माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. आज स्त्री ज्या पद्धतीनं काम करत असते ते खटकत असतं. एखाद्या स्त्री चांगल्या पद्धतीनं काम करु शकते त्यामुळं मग तिला अडकवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार सुरु होतात, असं शीतल म्हात्रे म्हणाल्या.