नेपाळमध्ये उलथापालथ; कम्युनिस्ट पार्टीच्या नेतेपदी प्रचंड यांची निवड

काठमांडू – नेपाळ कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष पुष्प कमल दहाल प्रचंड यांची आज सत्तारुढ पक्षाचे नवीन संसदीय नेते म्हणून निवड करण्यात आली. पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या जागेवर प्रचंड यांची निवड करण्यात आली. प्रचंड यांच्या नावाची शिफारस पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाळ यांनी केली.

प्रचंड यांच्या गटाची बैठक न्यू बाणेश्‍वर येथील संसद भवनाच्या इमारतीत झाली. त्यावेळी पक्षाचे दोन अध्यक्ष निवडण्यात आले. त्यापैकी एक माधव कुमार नेपाळ हे आहेत. मंगळवारी ओली यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात अले. तसेच संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या प्रतिनिधीगृहला विसर्जित करण्याची घटनाबाह्य शिफारस केल्याबद्दल ओली यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

विसर्जित करण्यात आलेले संसदेचे प्रतिनिधीगृह पुनरुजीवित करणे आणि नवीन सरकार स्थापन करणे हे आपल्यापुढील प्राधान्याचे काम असेल, असे प्रचंड यांनी म्हटले आहे. आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवताना लोकप्रतिनिधींनी आपल्यावर जो विश्‍वास दाखवला, त्याबद्दल प्रचंड यांनी आभारही व्यक्‍त केले आहेत.

प्रचंड यांच्या गटाने आपल्याकडे पक्षातील दोनतृतीयांश बहुमत असल्याने आपल्यालाच पक्षाची अधिकृत ओळ्ख मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आपल्या गटाकडे बहुमत असून पक्षाच्या केंद्रीय समितीतील 315 सदस्यांच्या अधिकृत सह्या आहेत, असे स्थायी समितीचे सदस्य लीला मणी पोखरीयाल यांनी म्हटले आहे.

ओली यांच्या निर्णयाविरोधात घटनापिठापुढे सुनावणी
दरम्यान संसद विसर्जित करण्याच्या पंतप्रधान ओली यांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका घटनापिठाकडे वर्ग करण्यात अल्या आहेत. प्राथमिक सुनावणीनंतर सर न्यायाधीश चोलेंद्र एसजेबी राणा यांच्या एकसदस्यीय पिठाने या 12 याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देऊन या याचिका घटनापिठाकडे वर्ग केल्या आहेत. या सर्व याचिकांवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.