पुणे – महाविद्यालयीन उद्योन्मुख कलाकारांसाठी प्रतिष्ठेची एकांकिका स्पर्धा असणाऱ्या “पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरी दि. 27 ते 29 डिसेंबर या कालावधी भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे, अशी माहिती महाराष्ट्रीय कलोपासचे अध्यक्ष अनंत निघोजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विश्वस्त मंगेश शिंदे उपस्थित होते.
महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने पुण्यासह जळगाव, नागपूर, अमरावती, रत्नागिरी आणि कोल्हापूर या केंद्रांवर “पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धा झाली. या प्राथमिक फेरीतील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रायोगिक विभागात क्रमांक पटकावलेल्या एकांकिकांची महाअंतिम फेरी दि. 27 आणि 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 1, सायंकाळी 5 ते 8 या वेळात आणि दि. 29 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 1 या वेळात भरत नाट्य मंदिरात होणार असल्याची माहिती देत, प्राथमिक फेरीत उत्कृष्ट सादरीकरण करून अंतिम फेरी गाठलेल्या संघांना महाअंतिम फेरीतही गुणवत्तापूर्ण सादरीकरण करू, असा विश्वास आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.
अंतिम फेरीत दाखल झालेले संघ दि. 26 डिसेंबर रोजी पुण्यात दाखल होत असून त्याच दिवशी स्पर्धेचे लॉटस् काढण्यात येणार आहेत. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 29 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ नाटककार चं. प्र. देशपांडे यांच्या हस्ते होणार आहे. महाअंतिम फेरीत 18 संघांचे सादरीकरण होणार असून महाअंतिम फेरीचे परिक्षक रंगकर्मी शाम जोशी, प्रा. प्रवीण भोळे आणि शुभांगी दामले करणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.
या एकांकिका सादर होणार
“मोठा पाऊस आला आणि…’, “भोंडला’, “दिव्यदान’, “खाप’, “मॅट्रिक’, “एच2एसओ4′, “वन डे सेलिब्रेशन’, “लाली’, “फॅड’, “टॅजेंट’, “एक्स्पायरी डेट’, “गेला शाम कुणीकडे’, “कविता’, “मर्सिया’, “रंग बावरी’, “इदी’, “पारो’, “हिरवीण’ या एकांकिका पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतिम फेरीत सादर होणार आहेत.