पुणे – सांस्कृतिक राजधानीतील “प्रतिष्ठित’ समजल्या जाणाऱ्या “पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे बिगुल शुक्रवारी वाजले. महाविद्यालयीन “कलाकारां’च्या उत्साहाने “भरत’चा परिसर नाट्यमय झाला होता.
केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातील महाविद्यालयांच्या नाट्यमंडळांमध्ये “मानाची’ समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा दि. 16 ते दि. 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे.
यंदाचे पुरुषोत्तम करंडकाचे हे 55 वे वर्ष आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या प्राथमिक फेरीसाठी एकूण 51 संघांची निवड झाली आहे. यावर्षी प्राथमिक फेरीचे परीक्षण अनिल दांडेकर, नितीन दंडूके, अश्विनी देशपांडे करणार आहेत. अनेक सामाजिक विषयांची मांडणी करणाऱ्या करंडकाच्या प्राथमिक फेरीची सुरुवात मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या “दहन आख्यान’ या एकांकिकेने झाली. यासह शुक्रवारी “मन की बात’ (बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय) आणि “आँखो देखी’ (जयवंतराव सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय) या एकांकिका सादर झाल्या. तर शनिवारी “सराव’ (सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग), “टेंजेंट’ (काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय) आणि “ग्रिडलॉक’ (कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय) या एकांकिका सादर होईल.