सोमेश्वर कारखान्याचा अग्निप्रदीपन समारंभ ः 10 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
सोमेश्वरनगर – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा सन 2019-20 या 58व्या गळीत हंगामाचा को-जन बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व त्यांच्या पत्नी रोहिणी या उभयतांचे हस्ते शुक्रवारी (दि. 25) धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर सकाळी पर पडला.
या कार्यक्रम प्रसंगी जगताप बोलताना म्हणाले. येत्या गळीत हंगामात 9.5 ते 10 लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून, येणारा हंगाम आव्हानात्मक असणार आहे. सोमेश्वर कारखाना व यंत्रणा हंगामासाठी सज्ज आहे. सोमेश्वरच्या शेतकरी सभासदांचा ऊस आठ ते साडेआठ लाख टन भरेल, असा प्राथमिक अंदाज आहे. 2 नोव्हेंबरला शासनाकडून राज्यात हंगाम कधी चालू करायचे याबाबत निर्णय होणार आहे. पण सोमेश्वरनगर परिसरातील सततच्या पावसामुळे ऊस शेतांमध्ये वापसा झालेला नाही व शेतात जाऊन तोडणे शक्य नसल्यामुळे सद्यस्थितीला 15 नोव्हेंबरपुढे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा हंगाम सुरू होऊ शकतो.
गळीत हंगामासाठी 2019-20साठी वाहतूक व तोडणी यंत्रणा 60 ट्रक, 260 ट्रॅक्टर, 150 डम्पिंग, 1000 ते 1050 बैलगाड्यांचे करार झाले आहेत. 5 हार्वेस्टर अशी यंत्रणा व चांगल्या पद्धतीने उसाचा पुरवठा होईल व गाळपही चांगल्या पद्धतीने होईल. सभासद, ऊस तोडणी कामगार, ऊस वाहतूक, कारखान्यातील कामगार, अधिकारी वर्ग संचालक मंडळ यांच्या सहकार्यातून येणारा हंगाम पण यशस्वीरीतीने
पार पाडू.
चालू हंगामामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी झाली महापुराने मोठ्या प्रमाणात ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. उसाचे क्षेत्र 50 टक्के घटले आहे, उत्पादनही कमी होणार आहे त्यामुळे चालू हंगामामध्ये साखरेचे उत्पादन व अल्कोहलचे उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे चांगला दर मिळू शकेल. या वर्षी सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये पाऊस चांगला झाला असल्यामुळे सर्व धरणे, तलाव, तळे भरली आहेत. पाण्याची उपलब्धता चांगली झाल्यामुळे शेतकरी सभासद यावेळेस पुढील हंगामासाठी उसाची मोठा प्रमाणावर लागण करेल. प्राथमिक अंदाजानुसार पुढील हंगामासाठी 30 ते 33 हजार एकर उसाची लागण होईल.
या प्रसंगी उपस्थित दौलत साळुंके, महेंद्र काकडे, सुनिल भगत, संभाजी होळकर, दत्ताआबा चव्हाण, सचिन खलाटे, उत्तम धुमाळ, लालासाहेब माळशिकारे, मोहन जगताप, किशोर भोसले, शांताराम कापरे, लक्ष्मण गोफणे, महेश महादेव राणे, दादासाहेब मोरे, प्रकाश जगताप, बाळासाहेब काकडे, सभासद, शेतकरी, सर्व अधिकारी कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक आर. एन यादव यांनी केले. तर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेंद्र रासकर यांनी आभार मानले.