पुणे – बालेवाडीतील नोंदणीकृत खेळाडूंचे भत्ते वाढवावेत, यासह शहरातील नाट्यगृहांचे प्रश्न संबंधित विभागाकडे मांडण्यात नेहमीच पुढाकार घेतला असून, युवा आणि क्रीडा संचालनालय बालेवाडी येथील नोंदणीकृत निवासी, अनिवासी खेळाडूंना मिळणारे भत्ते वाढवून मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले.
बालेवाडी येथील नोंदणीकृत निवासी, अनिवासी खेळाडू जेव्हा स्पर्धेसाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांना आहार भत्ता २०० रुपये मिळतो. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी थोडा नाश्ता आणि दूध तसेच रात्रीचे जेवण २०० रुपयांत होत नाही. त्यामुळे आहार भत्ता २०० रुपयांवरुन ५०० रुपये मिळावा आणि निवासी भत्ता ५०० रुपयांऐवजी १००० रुपये करण्यासाठी पाठपुरावा करण्याची हमी शिरोळे यांनी दिली.
राज्य सरकारच्या मालकीच्या आणि सरकारतर्फे चालविल्या जाणाऱ्या नाट्यगृहांचा दर्जा सुधारण्यासाठीही सांस्कृतिक मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून शिरोळे म्हणाले, की राज्यातील नाट्यगृहांमध्ये सुधारणा व्हाव्यात, यासंबंधीचे पत्र कलाकारांनी दिले होते. त्यामुळे नाट्यगृहांच्या सुधारणांमध्ये स्वतः लक्ष घालून दर्जा वाढवणार आहे.
बांधकामावस्थेत असलेली नाट्यगृहे तातडीने बांधून पूर्ण करावीत, काही नाट्यगृहांमध्ये तातडीने डागडुजी करावी, काही शहरे आणि निमशहरांमध्ये चांगल्या नाट्यगृहांच्या प्रकल्पांसाठी सरकारने निधी दिला आहे. मात्र, त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही, ते प्रकल्प सुरू व्हावेत, तसेच अन्य निमसरकारी संस्थांच्या नाट्यगृहांच्या दर्जातही सुधारणा व्हावी, त्यासाठी अर्थसाह्य मिळवून देण्यात लक्ष देणार असल्याचे शिरोळे यांनी स्पष्ट केले.
या वेळी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. शिरोळे यांच्या प्रयत्नांमुळे परिसराचा विकास होईल, अशा विश्वास याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.