नवी दिल्ली – ऑगस्तावेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात ईडीने आज व्यावसायिक रतुल पुरी यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार ते कार्यालयात आले. पण चौकशी सुरू असतानाच मध्येच स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने ते बाहेर गेले आणि तेथून ते पसार झाले. त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण ते आऊट ऑफ रेंज असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ते भाचे आहेत.
त्यांना आता पुन्हा नव्याने समन्स बजाऊन पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. पुरी हे हिंदुस्तान पॉवर कंपनीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे ईडीने या आधीही चौकशी केली आहे. पण त्यांना सातत्याने चौकशीसाठी पाचारण केले जात असल्याने ते त्रस्त झाले आहेत. ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टरचे हे खरेदी प्रकरण 3600 कोटी रूपयांचे आहे. पण त्यात हवाईदलाच्या अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याने युपीए सरकारच्या काळातच हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने या आधीच अनेक जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.