जिल्हा रुग्णालयात शुद्ध पाण्याची सुविधा

तीन ठिकाणी आरओ वॉटर प्युरिफिकेशन यंत्रणेचा प्रारंभ
सातारा – सातारा जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना शुध्द निर्जंतुक पाणी मिळावे, यासाठी तीन ठिकाणी आरओ वॉटर प्युरिफिकेशन यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी या सुविधांची पाहणी करून त्यांचा शुभारंभ केला. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पिण्याच्या शुध्द पाण्याची प्रचंड अडचण होती.

रुग्णांना अथवा त्यांच्या नातेवाईकांना पंधरा वीस रुपये मोजून बाटलीबंद पाणी घेण्याची वेळ येत होती. नाही तर तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीकडे यावे लागत असे. मात्र, प्रसूती कक्ष व अतिदक्षता विभागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रचंड गैरसोय झाली होती. ही अडचण ओळखून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी लक्ष्य कार्यक्रम व रुग्ण कल्याण समिती या दोन्ही उपक्रमांतून वॉटर कुलर व जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित केली.

या सुविधांमध्ये ब्ल्यू स्टारची कुलिंग सिस्टिम देण्यात आली असून या सुविधांना दोन लाख रूपये खर्च आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अतिदक्षता विभाग, आयसीयू व बाह्यरुग्ण विभाग या तीन ठिकाणी ही सेवा सुरू झाल्याने रूग्णांसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे. डॉ. आमोद गडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच तळमजल्यावर अन्नदानाची सुविधा देणाऱ्या सोशल फाउंडेशनकडून सार्वजनिक उपक्रमातून वॉटर एटीएम सुविधा लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)