सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी आयुक्त रोखणार का?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी, प्रशासन आणि ठेकेदारांमधील अर्थिक लागेबांधीचे अनेक किस्से उजेडात येत आहेत. शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष संपत आलेले असताना 82 लाखांच्या वह्यांची केलेली खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विशेष म्हणजे शिक्षण समिती आणि स्थायीने मान्यता दिल्यानंतरही आयुक्तांनी या खरेदीच्या मान्यतेवर स्वाक्षरी केलेली नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाची मनमानी आयुक्त थांबवून सर्वसामान्यांच्या पैशांची उधळपट्टी रोखणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यासाठी अवघे तीन महिने शिल्लक राहिले आहेत. पूर्वी दिलेल्या वह्या अपुऱ्या पडत असल्याचे कारण देत विद्यार्थ्यांना आणखी वह्या देण्याच्या नावाखाली थेट पद्धतीने शिक्षण समितीमार्फत 82 लाखांच्या वह्यांचा प्रस्ताव मांडण्यात आला व तो संम्मत करण्यात आला. त्याला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला दिले जाते. ठराविक एका ठेकेदाराची यामध्ये मक्तेदारी आहे. मनमानी पद्धतीने या ठेकेदाराला शालेय साहित्य पुरविण्याचा ठेका देण्याची प्रथाच अनेक वर्षांपासून सुरू आहे.
यावर्षी मात्र यामध्ये आणखी भर टाकून शैक्षणिक वर्ष संपण्याच्या कालावधीत 82 लाखांची उधळपट्टी केली जात आहे. केवळ टक्केवारीसाठी आणि ठेकेदार पोसण्यासाठी ही खरेदी सुरू असल्याची टीका सर्व स्तरातून होऊ लागल्यानंतर आयुक्तांनी या खरेदीला अद्याप मान्यता दिलेली नाही. काहीजणांनी या थेट खरेदीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयुक्त ही खरेदी थांबविणार की सत्ताधारी आणि ठेकेदाराच्या दबावाला बळी पडून मान्यता देतात याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.