पाच दिवसांत दीड लाख क्‍विंटल कापूस खरेदी

पणन महामंडळाचा यंदा विक्रम : शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढला

पुणे – गेल्या पाच दिवसांत पणन महामंडळाने राज्यभरातील खरेदी केंद्रांवर 1 लाख 50 हजार क्‍विंटल कापूस खरेदीचा विक्रम केला आहे. राज्यातील एकूण 34 खरेदी केंद्रांवर ही प्रक्रिया सुरू आहे. मोबदल्यात 7 कोटी 40 लाखांची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे. तर आतापर्यंत 15 कोटी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली आहे.

राज्यात पडलेल्या पावसाचा कापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कापसाच्या आर्द्रतेनुसार प्रतवारी करुन त्याची आधारभूत दराने खरेदी केली जात आहे. त्यासाठी राज्यभरात एकून 50 हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यातची घोषणा करण्यात आली होती; मात्र, आतापर्यंत केवळ 34 खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पणन महामंडळच्या कापूस हमीभाव खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.

पणन महामंडळाने 20116-17 मध्ये राज्यभरात खरेदी केंद्र सुरू केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. त्यावर्षी तर पणन महामंडळाला एक क्विंटलदेखील कापसू खरेदीसाठी मिळाला नाही. त्यानंतर 2017-18 मध्ये केवळ 2 हजार 855 क्विंटल, तर 2018-19 मध्ये 35 हजार 763 क्विंटल कापुस खरेदी केला होता. त्या तुलनेत भारतीय कापूस महामंडळाने 2016-17 मध्ये 2 लाख 31 हजार क्‍विंटल, 2017-18मध्ये 68 हजार 383 क्‍विंटल तर 2018-19 मध्ये 9 लाख 53 हजार क्‍विंटल कापूस खरेदी केला. यंदा कापूस महामंडळाने 81 खरेदी केंद्र सुरू केली असून, त्यामध्ये आतापर्यंत 2 लाख 55 हजार क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.