सासवड : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम तापला असून, उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने माघारींमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही झेडपी गटांमध्ये थेट लढती निश्चित झाल्या असून (दि.५) फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (दि. २७) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी चार गटांतून २१ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे झेडपीसाठी १७ पक्षीय आणि २ अपक्ष असे एकूण १९ उमेदवार रणांगणात उरले आहेत. पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने माघारी घेतल्या असून, दाखल अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. ३३ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती जाणार आहे. पाच दिवस अर्ज माघारीसाठी उपलब्ध झाल्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रणनीती राबवत माघारी घडवून आणल्या. जिल्हा परिषद गटनिहाय- दिवे- गराडे गट : भाजपकडून दिव्या जगदाळे, शिवसेनेकडून ज्योती झेंडे, तर राष्ट्रवादीकडून रुपाली झेंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. वीर- भिवडी गटात नऊ उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव, शिवसेनेचे समीर जाधव, काँग्रेसचे नवनाथ माळवे, भाजपचे हरिभाऊ लोळे, तसेच अपक्ष म्हणून अनिल धिवार आणि हेमंतकुमार भाऊसाहेब माहूरकर निवडणूक लढवत आहेत. नीरा- कोळविहीरे गटात सहा उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर चार उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादीच्या प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, भाजपच्या सीमा धायगुडे, काँग्रेसच्या सविता बरकडे आणि शिवसेनेच्या भारती म्हस्के यांच्यात सामना रंगणार आहे. बेलसर गटात दत्ता झुरंगे यांचे आव्हान बेलसर गटात काँग्रेसचे दत्तात्रय झुरंगे यांनी भाजप, राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. बेलसर- माळशिरस गटात पाच उमेदवारांनी माघार घेतली असून सहा उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसचे दत्तात्रय मारुती झुरंगे, भाजपचे अजय इंगळे, शिवसेनेचे रमेश इंगळे, शिवसेना (उबाठा)चे अमोल कामठे, राष्ट्रवादीचे गौरव कोलते, आम आदमी पक्षाचे शहाजी कोलते यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.