महसूलमध्ये समन्वयाचा सेतू बांधणाऱ्या पुरंदरच्या तहसीलदार ‘रुपाली सरनोबत’

पुरंदर तालुक्‍यात करोना साथीत तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी महसूल प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून करोनाविरोधात लढा दिला आहे. नागरिकांना विकास प्रक्रियेत सहभागी करीत प्रत्येकांना न्याय देण्याचे काम त्यांनी पुरंदरमध्ये केले आहे.

आज महिला स्वकर्तृत्वाने यशाच्या शिखरावर पोहोचल्या आहेत. महसूल प्रशासनातील नवदुर्गा म्हणून त्यांनी आपल्या कामांचा ठसा उमटविला आहे. पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या प्रशासकीय कार्याला देण्यात आलेला उजाळा…

पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांचा जन्म 19 मार्च 1976 मध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्‍यातील शेतकरी कुटुंबातील आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण हे जळगाव येथेच मराठी माध्यमातून झाले. मुंबई येथे बीएससी (केमिस्ट्री), एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले. 2004 मध्ये लग्नानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कोकण विभागामध्ये रायगडमध्ये नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.

2007 मध्ये पुणे जिल्हा कार्यालय व 2010 ते 13 येथे व 13 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्‍यात तहसीलदार म्हणून सेवा बजावली. 2019 मध्ये पुरंदर तालुक्‍यांमध्ये नवदुर्गा रुपाली सरनोबत यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला.

आपत्तीविरोधात तालुका प्रशासनाला सोबत घेत वाघिणीसारख्या काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी म्हणजे सरनोबत. पुरंदर तालुक्‍यात आल्यानंतर त्यांची अधिकारी व सर्वसामान्याप्रती माणुसकी सुरेख मेळ घालणारी ठरली आहे. तालुक्‍यात कार्यभार स्वीकारल्यानंतर नैसर्गिक आपत्तीमधील पंचनामे पूर्ण करणे, शासनाला माहिती पुरविणे, नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई वाटप करणे, आदी महत्त्वाची कामे केली आहेत. शासकीय सातबारा ऑनलाइन करण्याबरोबरच तालुक्‍यात पीएम. किसान योजेनेचे त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. प्रशासकीय कामांना गती देतानाच त्यांनी कधीही कामकाजात खंड पडू दिला नाही.

सहा महिन्यांपासून पुरंदर तालुका करोनाविरोधात लढत आहे. या काळात सरनोबत यांचा खऱ्या अर्थाने प्रशासकीय सेवेतील कसोटीचा काळ सुरू झाला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या प्रशासकीय सेवा बजावण्यात कोठेही कमी पडत नाहीत. गावोगावी उद्‌भवणाऱ्या समस्या, करोना रोखण्यासाठी अलगीकरण, अन्य सुविधा पुरवणे, विस्थापित कामगारांची माहिती गोळा करणे, दानशूर व्यक्‍ती व शासनाच्या माध्यमातून गरजू मजूर, नागरिकांना अन्नधान्य वाटप, मदतीचा हात देण्यासाठी कामे नियोजनबद्धरित्या पार पाडली आहेत.

करोनाच्या साथीत त्यांच्या सेवेतील अनुभवाची शिदोरी कामी येत आहे. त्यांच्यातील नेतृत्व गुण महसूल प्रशासनाला दिशादर्शक ठरत आहेत. त्यांनी कोविड सेंटर तयार करताना जागेची निवड, सोयी, सुविधा, लोकांवर योग्य नियंत्रण, बाजारपेठांचे नियोजन, सोशल डिस्टन्सिंगसाठी खास प्रयत्न हे सरनोबत यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी नियोजन केले. त्या आपल्या कर्तव्यापासून तीळमात्रही विचलित होत नाहीत. त्यांच्या नियंत्रणाखाली पुरंदरचे महसूल प्रशासन चांगले काम करीत आहेत. सरनोबत हे गावागावांत स्वतः कार्यरत आहेत. रुग्णांना भेटून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत आहेत.

विभागीय आयुक्‍त, जिल्हाधिकारी यांचे आदेश व सूचनांचे पालन करून त्या काम करीत आहेत. एक महिला अधिकारी सर्वसामान्य जनहिताच्या दृष्टीने तळमळीने काम करीत आहेत. पुरंदरच्या नवदुर्गा म्हणून सरनोबत यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

– शब्दांकन: अमोल बनकर, (सासवड)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.