सासवड -शहरातील करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज सासवड शहरात तब्बल 8 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून, या रूग्णांमध्ये सासवड शहरातील सोपान नगर परिसरातील 70 वर्षीय नागरिकांचा समावेश आहे.
सासवड शहरातील जगताप आळी परिसरात जय महाराष्ट्र चौकात एका 34 वर्षीय महिला व तिच्या 9 वर्षीय मुलाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोडित नाका परिसरातील संगमेश्वर हौसिंग सोसायटीत एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास करोनाची लागण झाली आहे. पालखी तळ रोड परिसरातील 38 वर्षीय पुरूषाची करोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे.
मिरजकर दवाखान्या मागील परिसरात 54 वर्षीय पुरूषाचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सासवड शहरातील करोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या लांडगे आळी परिसरातील एका 36 वर्षीय पुरूषास करोनाची लागण झाली आहे. आजच्या आठ नवीन करोना रुग्णांची भर पडल्याने सासवड शहरातील एकूण करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 69वर पोहचली आहे.
कुंभारवळण, सोनोरी गावे भयभीत
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, सोनोरी, धनकवडी या गावात प्रत्येकी 1 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे तालुक्यातील करोना रूग्णांची संख्या 98 वर पोहचली आहे.
सासवड शहर 8 दिवस लॉकडाऊन
सासवड शहरातील करोना रूग्णांची वाढती संख्या आटोक्यात येण्यासाठी व करोनाची साखळी संपुष्टात यावी, या हेतूने सासवड नगरपालिकेने दि. 3 ते 11 जुलै या आठ दिवसांसाठी सासवड शहर लॉकडाऊन केले आहे. या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असून सकाळी 6 ते 9 यावेळेत दूध विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. सासवड शहरातून इतर ठिकाणी नोकरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी नगरपालिकेत नोंदणी करणे बंधनकारक केले असून, या नागरिकांनी करोना तपासणी प्रमाणपत्र नगरपालिकेत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.