नीरा, (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे. ही निवडणूक प्रामुख्याने महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये होईल. महाविकास आघाडीला राज्यात सत्ता आणणे अत्यंत महत्त्वाच आहे. यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सध्या प्रयत्न सुरू आहेत.
मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आता बंडाळीची चिन्हे दिसत आहेत.
पुरंदर-हवेली मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा अट्टाहास राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून धरला जातो आहे. त्यामुळे पुरंदरमधील आघाडीमध्ये सध्या चिंतेचा वातावरण निर्माण झाले आहे.
पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे धुरा सध्या माणिकराव झेंडे यांच्या खांद्यावर आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माणिकराव झेंडे यांनी पक्षाच्या माध्यमातून चांगलं काम करून सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून दिली. त्याचबरोबर आमदार संजय जगताप यांना बरोबर घेत सुप्रिया सुळे यांचा विजय सुखकर केला.
मात्र सध्या लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभेची निवडणूक लागत असतानाच पुरंदरची जागा राष्ट्रवादीला मिळावी असा अट्टाहास पवार गटाकडून केला जात आहे.
खा. सुप्रिया सुळे यांनी पुरंदरची जागा ही काँग्रेसची असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तरी देखील माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांना पुढे करून पुरंदरची जागा पवार गटालाच मिळावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे सोमवारी (दि. 14) जाऊन मागणी करण्यात आली.
त्या प्रश्नाचे उत्तर टाळले
पुरंदरची जागा ही काँग्रेसला जाणार असे माहीत असून सुद्धा संभाजीराव झेंडे यांना याच पक्षातील लोकांनी दुष्काळात, त्याचबरोबर वेळोवेळी कार्यक्रमांसाठी खर्च करायला लावला. त्यामुळे संभाजीराव झेंडे देखील आता गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
सासवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काही झाले तरी आपण ही निवडणूक लढणारच असे म्हटले आहे. मात्र ही जागा काँग्रेसला गेली तर काय? या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले; मात्र त्यांच्या शेजारीच बसलेल्या माणिकराव झेंडे या तालुकाध्यक्षांनी आपण आघाडी बरोबर राहू हे स्पष्ट केला आहे. मात्र तरी देखील ही सर्व मंडळी जयंतराव पाटलांकडे गेली होती.
तर विजय शिवतारे यांना फायदा
शरद पवार जेजुरी येथे कार्यक्रमासाठी आले असताना देखील शरद पवारांनी यावेळी संजय जगताप हेच या निवडणुकीमध्ये आघाडीचे उमेदवार असतील असे स्पष्ट केला आहे. मात्र तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून पुरंदरच्या जागेवर दावा केला जात आहे.
यामुळेच पुरंदरमध्ये आघाडीत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाला आहे. त्याची किंमत पुढे जाऊन शरद पवार आणि त्यांच्या आघाडीला मोजावी लागणार आहे. संजय जगताप आणि संभाजीराव झेंडे यांच्यामध्ये मत विभाजन झाल्यास त्याचा फायदा महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांना होणार आहे. त्यांचा विजय सोपा होणार हे निश्चित आहे.
आमदार जगतापांची सावध भूमिका
आमदार संजय जगताप यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. मी आघाडीतून निवडणूक लढणार आहे. ही जागा काँगेसची आहे ती काँग्रेसलाच मिळणार आहे. अस त्यांनी म्हटले आहे.
संभाजी झेंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते वरिष्ठ घेतील. त्यामुळे आपल्याला याबाबतची चिंता नसल्याच त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केला आहे.
संभाजी झेंडे यांना अजित पवार गटाकडून बळ
माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे हे प्रशासकीय क्षेत्रातील अत्यंत चांगले अधिकारी आहेत. मात्र राजकारणामध्ये त्यांना फारसा अनुभव असल्याचे दिसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या आघाडीत बिघाडी व्हावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. यातूनच अनेक अजित पवार गटातील कार्यकर्ते संभाजी झेंडे यांना बळ देताना पहायला मिळत आहेत.