पुरंदर शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर!

अमोल बनकर
सासवड – पुणे जिल्हा परिषदेकडून सध्या शिक्षकांच्या बदल्या संदर्भात याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. या बदली प्रक्रियेमध्ये पुुणे जिल्ह्यातील संपूर्ण प्राथमिक शाळांची माहिती पुणे जिल्हा परिषदेने मागितली असून यासंदर्भात पुरंदर पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संपूर्ण शाळांची माहिती दिली नसल्याने बदली प्रक्रिया लांबणीवर पडणार की अपूर्ण शाळांची माहिती घेऊन प्रक्रिया पुढे सुरू राहणार याबाबत शिक्षकांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. तर अर्धवट यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेने प्राथमिक शिक्षकांच्या अंतर्गत बदल्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेने पुणे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना अवघड शाळा क्षेत्रांची माहिती मागितली होती. सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती पूर्ण स्वरूपात भरून दिली असून पुरंदरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी मात्र अर्धवट माहिती दिली असल्याने माहितीच्या कॉलमध्ये सर्व शाळांची माहिती प्राप्त नाही, असा शेरा मारून पाठवले असल्याने पुरंदर तालुक्यातील शिक्षकांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. यामध्ये अवघड शाळांमध्ये 31 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यात देखील अनेक त्रुटी असल्याचे शिक्षकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, 31 शाळांची माहिती देण्यात आली असून उर्वरित शाळांची माहिती मिळेपर्यंत ही बदली प्रक्रिया पूर्ण होणार की अर्धवट राहणार याबाबत शिक्षकांच्यात चर्चा रंगत आहेत.
अवघड शाळांच्या क्षेत्रांची माहिती जिल्हा परिषदेने घेतली असता यामध्ये नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये असणारे गाव याची सासवड तहसीलदार यांच्यामार्फत असणारी माहिती, सरासरी पर्जन्यमान दोन हजार पेक्षा जास्त अथवा नैसर्गिक आपत्तीने संपर्क तुटणारे गाव याची माहिती तहसील कार्यालय सासवड यांच्याकडून प्राप्त करून घेऊन, हिस्त्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगल प्रदेश वनविभाग सासवड व तहसील कार्यालय सासवड यांच्यामार्फत असा प्रदेश आहे किंवा नाही माहिती घेणे,
वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव वाहतूक योग्य रस्ते न जोडलेल्या शाळा एसटी बसेसची सोय आहे किंवा नाही याबाबत सासवड एसटी आगार यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेणे, संवाद छायेचा प्रदेश बीएसएनएलकडील माहिती, डोंगरी भागाबाबत तहसील कार्यालय यांच्याकडे माहिती प्राप्त करून घेणे, राष्ट्रीय राज्य महामार्ग पासून दहा किलोमीटरच्या दूर असणाऱ्या शाळांची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्राप्त करून घेणे यापैकी तीन निकषाला पात्र असणाऱ्या शाळांची माहिती देण्यात आली आहे.
31 शाळांची पाठवण्यात आलेली माहिती
केंद्र माहूर यांच्या अंतर्गत आतकरवाडी, गोळेवस्ती (माहूर) शिंदेवाडी, टोणपेवाडी (मांढर), मांढर, माळवाडी, भिवडी केंद्रांतर्गत देवडी, चिव्हेवाडी, गराडे केंद्र दुरकरवाडी, वारवडी, सोमर्डी, दरेवाडी, नीरा केंद्रांतर्गत कोडेवाडी, ब्रह्मणदरा, राख केंद्राअंतर्गत चौरेवाडी, रणवरेवाडी, वाल्हे केंद्रांतर्गत पिंगोरी, वीर केंद्रांतर्गत बनकरवाडी, हारणी, काळदरी केंद्रांतर्गत दवणेवाडी, धनकवडी, काळदरी, बहिरवाडी, पिसाळवाडी, चिकणेवाडी, बांदलवस्ती, हुंबेवस्ती, कोंडकेवाडी, सुपे केंद्रांतर्गत घेरापानवडी, पानवडी.
तात्कालीन गट-शिक्षणाधिकाऱ्यांनी 56 शाळांची माहिती जिल्हा परिषदेकडे पाठवली होती. राहिलेल्या 211 शाळांची माहिती तहसीलदार, वनविभाग, एसटी आगार प्रमुख, बांधकाम विभाग यांच्याकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. ती माहिती प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात येईल व यावर हरकती दाखल करण्यासाठी मुदत आहे. यामध्ये हरकतींचा विचार करून पुढील कार्यवाही होईल.
– पी. एस. मेमाणे, गटशिक्षणाधिकारी, पुरंदर





