चेन्नईसमोर पंजाबचे पारडे जड

मुंबई  -आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात पहिले सामने गमावलेल्या पंजाब किंग्ज व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज सामना होत आहे. दोन्ही संघांसाठी स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय मिळवणे क्रमप्राप्त बनले आहे.

पंजाबच्या संघात कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, ख्रिस गेल, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, सर्फराज खान व निकोलस पुरन अशी तगडी फलंदाजी आहे. अर्थात राहुल भरात असला तरीही मयंकला अद्याप सूर गवसलेला नाही. तसेच पहिल्या सामन्यात पुरननेही निराशाच केली आहे. तसेच गेलदेखील स्थिरावल्यानंतर स्वस्तात बाद होत असल्याने त्यांना दीपक हुडाच्या खेळीवर जास्त अवलंबून राहावे लागणार आहे.

फलंदाजी कागदावर बलाढ्य वाटत असली तरीही प्रत्यक्ष मैदानावर त्याची साक्ष पटली तरच या सामन्यात पंजाबला विजयाची आशा करता येणार आहे. गोलंदाजी त्या मानाने भेदक आहे. अनुभवी महंमद शमी याच्यासह मुरुगन अश्‍विन, दीपक हुडा, फॅबियन ऍलेन, झाय रिचर्डसन व लेग स्पीन गोलंदाज रवी बिश्‍नोइ असे सरस गोलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत.

दुसरीकडे चेन्नईबाबत बोलायचे झाले तर कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सुरेश रैना, चेतेश्‍वर पुजारा, रवींद्र जडेजा, फाफ डुप्लेसीस, सॅम कुरेन व ऋतुराज गायकवाड अशी भक्‍कम फलंदाजी त्यांच्याकडे असली तरीही पहिल्या सामन्यात हेच प्रमुख फलंदाज अपयशी ठरले होते. गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या स्पर्धेत सुमार कामगिरी केलेल्या चेन्नईला यंदाच्या स्पर्धेत भरीव कागिरी करायची असेल, तर त्यांची फलंदाजी बहरली पाहिजे.

तसेच गोलंदाजांनाही आपली जबाबदारी ओळखून कामगिरी केली पाहिजे. यंदा सर्व प्रमुख खेळाडू संघात परतले असून, पहिला सामना गमावलेल्या चेन्नईला आता जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. त्यांचे प्रमुख फलंदाज कशी कामगिरी करतात यावर त्यांचे या स्पर्धेतील यश अवलंबून आहे. अष्टपैलू ड्‌वेन ब्राव्होदेखील या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

धोनीकडे लक्ष
गेल्या वर्षीच्या स्पर्धेत साफ अपयशी ठरलेल्या चेन्नईचा कर्णधार धोनीलाही कामगिरी सिद्ध करावी लागणार आहे. गेल्या वर्षी अमिरातीत झालेल्या स्पर्धेत धोनीने साफ निराशा केली होती. त्यावेळी त्याची संथ फलंदाजी पाहून त्याच्या चाहत्यांनीही त्याला ट्रोल केले होते. बेस्ट फिनिशरचे गतवैभव परत मिळवण्यासाठी धोनीला आता या स्पर्धेतील पुढील सामन्यात गांभीर्याने खेळ करावा लागणार अशून त्याची कामगिरीच लक्षवेधी ठरेल.

सामन्याची वेळ
सायंकाळी : 7.30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌सवर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.