ओटावा – कॅनडातील हॅमिल्टन येथे गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता बस स्टॉपवर 21 वर्षीय पंजाबी विद्यार्थीनी हरसिमरत रंधावाची गोळी मारून हत्या करण्यात आली. मोहॉक कॉलेजमध्ये शिकणारी हरसिमरत बसची वाट पाहत असताना दोन वाहनांमधील गोळीबारात चुकून ती बळी ठरली.
हॅमिल्टन पोलिसांनी सांगितले की, काळ्या मर्सिडीज एसयूव्हीतून सफेद सेडानवर गोळ्या झाडल्या गेल्या, यात हरसिमरतला छातीत गोळी लागली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही वाहने पळून गेली. एका जवळच्या घराच्या खिडकीवरही गोळ्या लागल्या, परंतु तिथे कोणी जखमी झाले नाही.
पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. ते संशयितांच्या ओळखीसाठी व्हिडिओ फुटेज आणि माहिती तपासत आहेत. या घटनेमुळे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षेची चिंता वाढली आहे.
टोरंटोतील भारतीय दूतावासाने शोक व्यक्त करत हरसिमरतच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मोहॉक कॉलेजनेही तिच्या मृत्यूबद्दल दुख: व्यक्त केले. ही घटना विद्यार्थी समुदायासाठी धक्कादायक ठरली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.