इस्लामाबाद : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात ७ पंजाबी मजूरांची दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. बलुचिस्तान प्रांतात बंडखोर दहशतवाद्यांकडून पुन्हा हिंसाचार केला जाण्याचे हे सर्वात अलिकडील उदाहरण आहे. हत्या करण्यात आलेले सर्व बांधकाम मजूर होते आणि ते मूळचे पंजाब प्रांतातील मूलतान जिल्ह्यातले रहिवासी होते. पंजगुर शहरातील खुदा-ए-अबदान भागात घर बांधण्यासाठी कामगार कामावर होते.
दुपारच्या जेवणानंतर ते सावलीमध्ये विश्रांती घेत होते, तेंव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी स्वयंचलित बंदुकांनी या मजूरांवर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारात सात मजूर जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला, अशी माहिती पोलिस महानिरीक्षक मोअज्जम जाह अन्सारी यांनी दिली. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतली नाही. मात्र हा दहशतवादी हल्ला होता आणि या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पंजगुरचे एसएसपी फाजिल शाह बोखारी यांनी सांगितले.
बलुचिस्तानमधील बंडखोरांकडून पंजाबी मजूरांवर हल्ल्यांच्या घटना यापूर्वीदेखील घडून गेल्या आहेत. बलुचिस्तानमध्ये पंजाबींचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे स्थानिक बलुच रहिवाशांना बलुचिस्तानमधील खनिज संपन्न नैसर्गिक स्रोत आणि सरकारी सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याचा बलुच बंडखोरांकडून केला जातो आहे. मात्र सरकारने हा आरोप फेटाळला आहे. अशाच एका घटनेत बलुच बंडखोरांनी ऑगस्टमध्ये प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात किमान २३ लोकांना ठार केले होते. सशस्त्र लोकांनी ट्रक आणि बसमधून प्रवाशांना उतरवले आणि त्यांची ओळख तपासल्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.