दुबई – निकोलस पूरन, ग्लेन मॅक्सवेल आणि ख्रिस गेल यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दिल्ली कॅपिटल्स्चा 5 गडी राखून पराभव केला.
विजयासाठी 165 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीचा डावही 3 बाद 56 असा गडगडला होता. मात्र, निकोलस पूरन आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी वादळी फलंदाजी करत दिल्लीच्या गोलंदाजीतील हवाच काढून घेतली. पूरनने 28 चेंडूत 6 चौकार व 3 षटकार फटकावत 53 धावांची खेळी केली. त्यापूर्वी गेलने 13 चेंडूत 3 चौकार व 2 षटकार अशी आतषबाजी करत 29 धावा फटकावल्या. यंदाच्या स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलने आज जबाबदारीने फलंदाजी करत संघाच्या विजयाला हातभार लावला. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतरही पंजाब पराभवाच्या छायेत होता. त्यावेळी दीपक हुडा व जेम्स निशाम यांनी 20 धावांची भागीदारी करत पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी,सलामीवीर शिखऱ धवन याने दमदार शतकी खेळी केल्याने दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 5 बाद 164 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याचा हा निर्णय धवन वगळता अन्य एकाही फलंदाजाने यशस्वी ठरवला नाही. समोरचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत असताना धवनने नैसर्गिक खेळ केला. स्पर्धेतील दुसरे शतक झळकावताना त्याने पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले.
सलामीवीर पृथ्वी शॉ, कर्णधार श्रेयस अय्यर, यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला मार्कस स्टोनिस, शेमरन हेटमायर व दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त होऊन संघात परतलेला ऋषभ पंत यांनी निराशा केली. पंजाबचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याने अत्यंत भेदक गोलंदाजी केली व दिल्लीचा धवन वगळता अन्य फलंदाजांवर अंकुश राखला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने धावा करत असलेली दुकडी स्टोनिस व हेटमायर यांना बाद करत शमीने दिल्लीच्या फलंदाजीतील हवाच काढून घेतली.
हेटमायरने 10 तर स्टोनिसने 9 धावा केल्या. श्रेयस अय्यर व पंत यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. पंतही ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीवर चकला. पृथ्वी शॉ याला केवळ 7 धावांवर जेम्स निशामने बाद केले व पंजाबच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.
समोरचे फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत असताना धवनने मात्र, संघाच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्याने यंदाच्या स्पर्धेतील आपले दुसरे शतक साकार केले. अखेरपर्यंत नाबाद राहताना त्याने केवळ 61 चेंडूत 12 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 106 धावांची खेळी केली.
पाच हजारी मनसबदार
शिखर धवनने या सामन्यात अफलातून शतकी खेळी केली. त्यात त्याने जेव्हा 62 वी धाव घेतली तेव्हा त्याने आयपीएल स्पर्धेतील आपल्या 5 हजार धावा पूर्ण केल्या. यंदाच्या स्पर्धेत पहिल्या काही सामन्यांत अपयश आल्यानंतरही त्याने कोणतेही दडपण न घेता खेळ केला. त्याने पंजाबच्या सर्व गोलंदाजांवर वर्चस्व राखले.
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 5 बाद 164 धावा. (श्रेयस अय्यर 14, मार्कस स्टोनिस 14, शिखऱ धवन नाबाद 106, महंमद शमी 2-28, जेम्स निशाम 1-17, ग्लेन मॅक्सवेल 1-31, मुरुगन अश्विन 1-33).
किंग्ज इलेव्हन पंजाब – 19 षटकांत 5 बाद 167 धावा. (निकोलस पूरन 53, ग्लेन मॅक्सवेल 32, ख्रिस गेल 29, कागिसो रबाडा 2-27).