चंदीगड – पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या वाढत्या किमतींदरम्यान दिवाळीपूर्वी पंजाबमधील लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब मंत्रिमंडळाने घरगुती ग्राहकांच्या वीज दरात प्रति युनिट 3 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, जो आजपासून लागू झाला आहे.
– राज्यावर 3 हजार कोटींचा बोजा
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक 3,316 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली. सीएम चन्नी म्हणाले की, ‘घरगुती ग्राहकांसाठी आम्ही वीज दर प्रति युनिट 3 रुपयांनी कमी करत आहोत.’
मिळालेल्या माहितीनुसार, 100 वॅटपर्यंतच्या विजेचा दर प्रति युनिट 1.19 रुपये आहे. परंतु नवीन दरानुसार 100 ते 300 युनिटसाठी 4 रुपये प्रति युनिट दराने आकारण्यात येणार आहे, जो पूर्वी 7 रुपये प्रति युनिट होता. याशिवाय 300 पेक्षा जास्त युनिटसाठी 5 रुपये प्रति युनिट दर आकारला जाईल.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी म्हणाले, पंजाबच्या जनतेसाठी ही दिवाळीची मोठी भेट असून या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, पंजाब सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार पंजाबमधील जनतेला स्वस्त वीज हवी आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका प्रस्तावित आहेत आणि दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्ष राजधानीच्या धर्तीवर तेथे मोफत वीज देण्याचे आश्वासन देत आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल पंजाबचा दौरा केला. केजरीवाल यांनी जूनमध्ये घोषणा केली होती की, पंजाबमध्ये आपचे सरकार आल्यास प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट मोफत वीज दिली जाईल. या घोषणेनंतर नवनियुक्त मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी वीज स्वस्त करण्याचा दबाव होता.