मुंबई -संजू सॅमसनच्या वादळी शतकी खेळीनंतरही पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
विजयासाठी 222 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा कर्णधार सॅमसन व जोस बटलर यांनी पंजाबच्या गोलंदाजांना फोडून काढले. मात्र, बटलर बाद झाला व त्यानंतर सॅमसनला अन्य कोणाची समर्थ साथ मिळाली नाही. त्याने एकाकी किल्ला लढवला. अखेरच्या षटकांत राजस्थानला विजयासाठी 13 धावांची गरज असताना त्यांचा डाव 7 बाद 217 धावांवर रोखला गेला व पंजाबने 4 धावांनी निसटता विजय मिळवला.
सॅमसन अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावांची गरज असताना बाद झाला. त्याने आपल्या 119 धावांच्या वादळी शतकी खेळीत 63 चेंडूत 12 चौकार व 7 षटकारांची बरसात केली मात्र, तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.
तत्पूर्वी, कर्णधार लोकेश राहुल व दीपक हुडा यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 221 असा धावांचा डोंगर उभारला. राहुलने 40 चेंडूत 91 तर, हुडाने 28 चेंडूत 64 धावांची वादळी खेळी केली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला. कर्णधार राहुलने मयंक आग्रवालसह डावाची आक्रमक सुरुवात केली. मयंक स्थिरावला असे वाटत असतानाच बाद झाला. मात्र, त्यानंतर राहुलला ख्रिस गेलने सुरेख साथ देत डाव सावरला.
गेलही अर्धशतकाकडे कूच करत असतानाच बाद झाला. त्याने 28 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 40 धावांची खेळी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 67 धावांची भागीदारी केली. गेल बाद झाल्यावर आलेल्या दीपक हुडाने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याने राहुलवरील ताण कमी करताना वादळी फलंदाजी केली. त्याने केवळ 20 चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली. त्याची आक्रमकता इतकी होती की सुरुवातीपासून धडाकेबाज फलंदाजी करत असलेला राहुलही दुर्लक्षित झाला.
हुडा अनावश्यक फटका मारून बाद झाला. मात्र, त्याने राहुलसह संघाला यंदाच्या स्पर्धेतील द्विशतकी धावसंख्या उभारून दिली. हुडाने आपल्या 64 धावांच्या खेळीत 28 चेंडूंचा सामना करताना 4 चौकार व 6 षटकार अशी फटकेबाजी केली. त्याने राहुलसह तिसऱ्या गड्यासाठी 105 धावांची भागीदारी केली.
तो बाद झाल्यावर आलेल्या निकोलस पुरनने निराशा केली. त्याचाही झेल सीमारेषेवर राहुल तेवतीयाने अप्रतिमरीत्या घेतला. त्यानंतर राहुलने धावांचा वेग वाढवला. मात्र, शतकाला केवळ 9 धावांची गरज असताना त्याने उंचावरून फटकावलेला चेंडूचे झेलात रूपांतर करत राहुल तेवतीयाने अप्रतिम
कामगिरी केली.
राहुल 91 धावांवर परतला. त्याने या खेळीत 50 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 5 षटकार अशी आतषबाजी केली. जाय रिचर्डसनही भोपळा न फोडताच बाद झाला. शाहरुख खान 6 धावांवर
नाबाद राहिला.
अखेर पंजाबचा डाव 6 बाद 221 धावांवर रोखला गेला. राजस्थानकडून चेतन सकारीयाने 3 गडी बाद केले. ख्रिस मॉरिसने 2 बळी घेतले. रियान परागने एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 221 धावा. (लोकेश राहुल 91, दीपक हुडा 64, ख्रिस गेल 40, मयंक आग्रवाल 14, शाहरुख खान नाबाद 6, चेतन सकारीया 3-31, ख्रिस मॉरिस 2-41, रियान पराग 1-7).